धुळे। जिल्ह्यात एक ते सात जुलै 2017 या कालावधीत वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात येणार आहे. धुळे जिल्ह्यास 8 लाख रोपांच्या लागवडीचे उद्दीष्ट आहे. या मोहिमेबाबत मा. वन मंत्री सुधीर मुनगंटीवर 1 जून रोजी नाशिक येथे आढावा बैठक घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर या मोहिमेत सहभागी प्रत्येक विभागाने अक्षांश, रेखांशसह अद्ययावत माहिती वनविभागाकडे तत्काळ सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी येथे दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात वृक्ष लागवडीबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
वनांचे प्रमाण वाढविणे आवश्यक
जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे म्हणाले, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वनांचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या वृक्ष लागवडीच्या मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे यंदाही वृक्ष लागवड मोहिमेचे सूक्ष्म नियोजन करीत मोहिम यशस्वीपणे राबवावी. नागरिक, स्वयंसेवी संस्थांनीही या मोहिमेत आपला सहभाग नोंदवीत पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेतला पाहिजे. प्रत्येक विभागाने दिलेल्या उद्दीष्टाप्रमाणे खड्डे खोदून त्याचे अक्षांश- रेखांशसह आवश्यक माहिती वनविभागाकडे सादर करावी. यावेळी ग्रीन आर्मी, वृक्ष लागवड मोहिमेसंदर्भात वनविभागाच्या कर्मचार्यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनबाबत माहिती दिली.
विविध विभागांच्या अधिकार्यांची उपस्थिती
यावेळी उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे (रोहयो), जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत, सहाय्यक वनसंरक्षक संजय पाटील, रेवती कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय शिंदे, लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन दुसाने, जिल्हा उपनिबंधक जे. के. ठाकूर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. बोटे (ग्रामपंचायत), अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.