वृक्ष लागवडीबाबत जनजागृती करणार्‍या वनखात्याच्या चित्ररथाचे एरंडोलला स्वागत

0

एरंडोल। पर्यावरण संवर्धनासाठी शासनातर्फे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येत असते. शासनाच्या वतीने यावर्षी पावसाळ्यात पाच कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असून वनविभागाच्या वतीने वृक्ष लागवडीविषयी जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचे एरंडोलात स्वागत करण्यात आले. नगराध्यक्ष रमेश परदेशी, पोलीस निरीक्षक बाळासाहेब केदारे यांनी चित्र रथाचे स्वागत केले. यावेळी नगराध्यक्ष परदेशी यांनी प्रत्येक नागरिकाने एका वृक्षाची लागवड करून त्याचे संवर्धन करावे असे आवाहन केले. वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी वृक्ष लागवड हा एकमेव उपाय असल्याचे त्यांनी सांगितले. नगर पालिकेच्या वतीने यावर्षी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून त्याचे योग्य ते नियोजन करण्यात येईल व सर्व वृक्ष जागविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले.

वृक्ष संवर्धन काळाजी गरज
दिवसेंदिवस पर्यावरणाचा र्‍हास होत चालला आहे. प्रदुषणाची समस्या ह वैश्‍विक समस्या बनली आहे. या समस्येवर मात करण्यासाठी वृक्ष लागवड करणे गरजेचे असून वृक्ष संवर्धन करणे हे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पोलीस निरीक्षक बाळासाहेब केदारे यांनी केली. वृक्षतोड होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

वनखात्याशी संपर्क करा: चित्ररथात टीव्ही लावण्यात आले होते. वनखात्याच्या वतीने वृक्ष लागवड व त्याचे संवर्धन या विषयावरील चित्रपट शहरातील नागरिकांना दाखविण्यात आले. चित्रपटाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. वनपरिक्षेत्र अधिकारी बी.एस.पाटील यांनी प्रास्तविक केले. परिसरात तसेच अन्य ठिकाणी वृक्षतोड सुरु असल्यास वनखात्याशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.

नागरिकांची भुमिका महत्वाची
वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक एन.ए.पाटील, लागवड अधिकारी नेमाडे यांचेसह वन खात्याचे कर्मचारी,सामाजिक वनीकरण विभागाचे कर्मचारी, पर्यावरणप्रेमी नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. दरम्यान शासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी नागरिकांची भूमिका महत्वाची असून ज्या नागरिकांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी वनखात्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.