धुळे । आगामी पावसाळ्यात राबविण्यात येणार्या वृक्ष लागवड मोहिमेसाठी विभागप्रमुखांनी आवश्यक ती माहिती वनविभागाकडे तत्काळ सादर करावी. या मोहिमेचे सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात गुरूवारी सकाळी 50 कोटी वृक्ष लागवडीसंदर्भात आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
अधिकार्यांची उपस्थिती
यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, वनविभागाचे प्रभारी उपवनसंरक्षक डी. यू. पाटील, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे (रोहयो) सहाय्यक वनसंरक्षक रेवती कुलकर्णी (रोहयो), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी सर्वच अधिकार्यांनी आपली मते व्यक्त केली. 31 मार्च 2017 पर्यंत वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदून तयार ठेवायचे असून 15 जून ते 7 जुलै 2017 या कालावधीत वृक्षारोपण करावयाचे आहे.
8 लाख रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट
जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे म्हणाले, 50 कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेसाठी धुळे जिल्ह्यास 8 लाख रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक विभागाने आपल्याला मिळालेल्या उद्दिष्टानुसार नियोजन केले पाहिजे. वृक्ष लागवडीसाठी आवश्यक जागा निश्चित करुन त्याचे अक्षांश व रेखांश यासह समन्वयक यांची माहिती तातडीने दिली पाहिजे. जेणेकरुन डाटा बेस पुस्तिका तयार करण्याचे काम सोपे होईल.
दरमहा आढावा बैठक
प्रभारी उपवनसंरक्षक पाटील यांनी सांगितले, आगामी पावसाळ्यात धुळे जिल्ह्यात 8 लाख रोपांची लागवड करावयाची आहे. त्यासाठी आवश्यक माहिती तातडीने सादर करावी. वनविभाग 4.12 लाख, सामाजिक वनीकरण विभाग 1.15 लाख, ग्रामपंचायत विभाग 2 लाख आणि विविध विभागांच्या सहकार्याने 85 हजार असे 8 लाख रोपांच्या लागवडीचे नियोजन आहे. जिल्ह्यात वनविभागाच्या 36 रोपवाटिका असून 61 लाख रोपे निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापुढे दरमहा आढावा बैठक घेण्यात येईल. तसेच वेळोवेळी ऑनलाइन आढावा घेण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितले.