-प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचा विशेष अहवाल
पिंपरी-चिंचवड :महापालिका स्थापन झाल्यापासून म्हणजेच 1986 पासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा विस्तार जलदगतीने होत गेला. वाढत्या शहरीकरणामुळे शहरातील व उपनगरातील वृक्ष संपदा महापालिकेच्या अकार्यक्षमतेमुळे व दुर्लक्षामुळे झपाट्याने कमी होत गेली. वृक्ष संवर्धन व संगोपन या मूलभूत बाबींकडे पालिका पर्यावरण विभाग, वृक्ष समिती, उद्यान विभाग यांनी पूर्णतः दुर्लक्ष केले. यामुळे हरित पट्ट्यामध्ये कमालीची घट झाली. त्याचा परिणाम शहरातील तापमान, प्रदूषण, भूजल, पक्षी या मुख्य चार घटकांवर झाला असल्याचे प्राधीकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या निरीक्षणात समोर आले आहे.
वृक्ष लागवडीचा पाच वर्षांचा अभ्यास
1. शहरातील सरासरी तापमानामध्ये 2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2. वाढत्या शहरीकरणामुळे माती, ध्वनी, हवा, पाणी व भूजल प्रदूषणामध्ये वर्षाला सरासरी 3 टक्क्यांनी वाढ निदर्शनास आली. 3. भूजल पातळीमध्ये सरासरी 22 टक्क्यांनी घट झाली. 4. वृक्षसंपदेवर अवलंबून असणार्या अन्न साखळी मधील पक्षांच्या संख्येमध्ये निम्याहून जास्त म्हणजेच 52 टक्क्यांनी घट निदर्शनास आली. यामध्ये मुख्यतः चिमणी सदृश पक्षी शहरातील अनेक भागातून हद्दपार झालेले दिसून आले. या चार घटकांचा सरळ सरळ संबंध वृक्षसंपदेशी निगडित आहे. यासाठी कृती समितीच्या पर्यावरण अभ्यासक गटाने पिंपरी चिंचवड शहरातील वृक्ष लागवड संदर्भातील गत पाच वर्षांचा अभ्यास केला.
अभ्यासक गटातील सहभागी
या पाहणीमध्ये अनेक निरीक्षणे नोंदवली. समिती अध्यक्ष व पर्यावरण अभ्यासक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण विभागाचे सदस्य विजय मुनोत, अर्चना घाळी, संतोष चव्हाण, अमित डांगे, अमृत महाजनी, विशाल शेवाळे, जयप्रकाश शिंदे, जयेंद्र मकवाना, आशिष गांधी, विजय जगताप, बाबासाहेब घाळी, अमोल कानु, संदीप सकपाळ, मंगेश घाग, सतीश देशमुख, लक्ष्मण इंगवले, बळीराम शेवते यांनी पाहणी व निरीक्षणामध्ये सहभाग घेतला.
पाहणी अहवालाच्या प्रमुख नोंदी अशा
1. सर्वेक्षण प्राधिकरण,भोसरी,पिंपरी,चिंचवड,सांगवी,हिंजवडी,रावेत-पुनवळे,चिखली या आठ विभागात केले.
2. या विभागांमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये अनेक सामाजिक संस्था व महानगरपालिका मिळून सुमारे 10 लाख वृक्ष लागवड केली आहे. मुळातच नसर्गिक रित्या अनेक वर्षांपासून असलेले सुमारे 12 लक्ष पूर्ण वाढ झालेले वृक्ष आहेत.
3. आठ विभागांपैकी प्राधिकरण व सांगवी परिसर सोडला तर इतर सहा विभागांमध्ये वृक्षसंपदा झपाट्याने संपत चालली आहे. हिंजवडी,पिंपरी,चिखली या विभागांमध्ये बांधकामांची संख्या वृक्ष संपदेच्या तुलनेत जास्त वाढलेली आहे.
4. प्राधिकरण व सांगवी परिसरात वृक्ष संगोपन व संवर्धन चांगल्या पद्धतीचे झाल्याचे आढळून आले. शहराची निम्म्यापेक्षा जास्त असलेली म्हणजेच 16 लक्ष वृक्षांपैकी 9 लक्ष वृक्ष या दोन विभागात आहेत.
5. महानगरपालिकेने राबविलेल्या वृक्ष संवर्धन व संगोपन योजनेअंतर्गत 2 रोपवाटिका असूनसुद्धा त्याचा पुरेपूर वापर करून घेण्यास पालिका असमर्थ ठरली.
6. आजही रोपवाटिका मरणासन्न अवस्थेत आहेत. उद्यानात लागवड केलेली 65 टक्क्यांपेक्षा जास्त वृक्षसंपदा संवर्धनाअभावी पूर्णतः नष्ट झाली. 5 वर्षातील आकडेवारीचा विचार केल्यास साडेसहा लाख वृक्ष नष्ट झाले. म्हणजेच तीन कोटी पासष्ट लाखांचेे नुकसान पालिकेस झाले.
7. म्हणजेच वृक्ष लागवड ही फक्त कागदावरच राहिली.त्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्याचे आढळून आले आहे. म्हणजेच गेल्या 5 वर्षात 60 टक्के वृक्ष नष्ट झाले. म्हणजेच पालिकेने लागवड केलेल्या 10 लेखापैकी 6 लाख वृक्ष देखभालीअभावी जळुन नष्ट झाले.
8. रोपे, माती, खत, पाणी व्यवस्था नीट नेटके नसल्यामुळे व योग्य नियोजनाअभावी हरितनगरी चे रूपांतर ओसाडनगरीमध्ये होत असल्याचे दिसून आले आहे.
9. शहरातील विकास प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली.वृक्षतोडीचा अहवाल पालिकेकडे उपलब्ध नाही.शास्त्रोक्त पद्धतीने वृक्ष तोड न झाल्यामुळे अनेक झाडांना प्राण गमवावा लागला.
10. योग्य पद्धतीने पालिकेने वृक्ष पुनर्रोपण न केल्यामुळे अनेक झाडांचा बळी गेला. तसेच वृक्ष पुनर्रोपण झाल्यानंतर त्यांची देखभाल न झाल्यामुळे 40 टक्के वृक्षांचा बळी गेला.बेसुमार वृक्षतोड आणि वृक्षाचोरी हे पण वृक्ष संख्या कमी होण्याचे एक कारण आहे.
समितीने सुचविलेले उपाय
1. शहराच्या हद्दीतील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांनकरवी वृक्ष लागवड दत्तक योजना राबवावी.
2. वृक्ष संवर्धन व संगोपन लागवड करणार्या सहकारी गृह सोसायटींना मिळकरामध्ये सूट देण्यात यावी.
3. रोपवाटिकेंचे तसेच उद्यानांचे इस्त्राईल च्या धरतीवर आधुनिकीकरण करावे.
4. टेकडी व उद्यानास वृक्ष दत्तक योजनेखाली आणून शाळा,सामाजिक संस्था, गुहरचना सोसायटी,कारखाने यांना सामावून घ्यावे.त्यामुळे वृक्षांचे योग्य संगोपन होऊन हरित पट्ट्यात वाढ होईल.
5. देशी वृक्षांची (वड,पिंपळ,उंबर,चिंच,आवळा,जांभूळ,पेरू) संख्या वाढण्यासाठी तात्काळ प्रयत्न करणे आवश्यक आहे.त्यामुळे पक्षी संवर्धन होण्यास मदत होईल.
6. सेंद्रीय खत निर्मिती प्रकल्प व कचर्यातून खत निर्मिती प्रकल्प याकरिता पालिकेने सामाजिक संस्थाना व गृह सोसायट्याना अनुदान द्यावे.
7. वृक्ष गणना दरवर्षी करण्यात यावी. कमी खर्चाच्या सॅटेलाईट डिजिटल या आधुनिक पद्धतीचा वापर दरवर्षी करता येऊ शकेल.
8. हरित नियमांचे पालन केल्यास पालिका नक्कीच वृक्षारोपण परीक्षेच्या प्रगतीपुस्तकात नक्कीच पास होईल.