जळगाव : मू.जे.महाविद्यालयाच्या जनसंज्ञापन आणि वृत्तविद्या विभागातर्फे वाचन प्रेरणा दिन आणि राष्ट्रीय वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरुपात वृत्तपत्र विक्रेते रामचंद्र वाणी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विभागप्रमुख प्रा.विश्वजीत चौधरी उपस्थित होते. सुरुवातीला प्रा.चौधरी यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांविषयी माहिती देत वृत्तपत्र वाटपाचे स्वानुभव कथन केले. वृत्तपत्र विक्रेता हा घटक उपेक्षित राहिलेला असून त्याला आजवर शासकीय व राजकीय पातळीवर केवळ आश्वासनांवरच बोळवण करण्यात आल्याचे सांगत चौधरी यांनी विक्रेत्यांच्या पाल्यांकरिता रोजगारासाठी शासनाने योजना आणावी असे प्रतिपादन केले.
मू.जे.महाविद्यालयात वृत्तपत्र पुरविण्याची सेवा देणारे रामचंद्र वाणी यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून त्यांचा पुष्प व “अजिंठा” नियतकालिक देवून विद्यार्थिनी प्रियंका अहिरे हिच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी रामचंद्र वाणी यांनी त्यांचे अनुभव कथन करीत सकाळी वृत्तपत्र वाटपाचा सुरु होणारा प्रवास सांगत ज्ञानदानाचे हे काम अनेक जोखमी पत्करीत करीत असल्याचे सांगितले. गेल्या वीस वर्षात अनेक वाचकांचे प्रेम लाभले असे सांगून रामचंद्र वाणी यांनी समाज घटकांकडून वृत्तपत्र विक्रेत्यांना योग्य सन्मान मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. जनसंज्ञापन आणि वृत्तविद्या विभागाचे प्रा. प्रशांत सोनवणे, केतकी सोनार उपस्थित होते.