शनीपेठ पोलिसांची कामगिरी : सावदा येथे वृद्धेला गंडविले
जळगाव – जिल्ह्यासह इतर ठिकाणी अनेक वृद्धांना गंडविणार्या भामट्याने बुधवारी सावदा येथे एका वृद्धेला 12 हजारात गंडविले. शनीपेठ पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी सापळा रचून त्याला वाल्मिक मंदिराजवळून ताब्यात घेतले. जळगावातील हरिओम नगरात राहणार्या डिगंबर कौतिक मानकर वय-43 याने जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणी नागरिकांना विशेषतः वृद्धांना गंडविले आहे. तीन महिन्यांपूर्वी देखील त्याला धुळे येथे एका वृद्धेला गंडविल्याने ताब्यात घेण्यात आले होते.
बहिणीचा मुलगा सांगून लुबाडले
बुधवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास सावदा येथे मेडीकल दुकानाच्या ओट्यावर एक वृध्दा बसलेली होती. वृध्देजवळ बसलेल्या एका तरूणाने तुमच्या बहिणीचा मुलगा असून भाजीपाला घेण्यासाठी 500 रूपये मागितले. वृध्देने लागलीच पैसे दिले. वृध्देला बोलण्यात गुंतवून तरूणाने त्यांच्याकडून 12 हजार रूपये काढून घेतले.
शनिपेठ पोलिसांनी रचला सापळा
दुपारी 2 वाजता सावदा येथे घडलेल्या घटनेबाबत शनिपेठ पोलिसांना व्हॉटसअॅपवर माहिती मिळाली. शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक व्ही.डी.ससे यांच्या पथकातील कर्मचारी दिनेशसिंग पाटील, अकीम शेख, अनिल धांडे, रविंद्र गुरचळ, गिरीश पाटील, नितीन बाविस्कर, गजानन बडगुजर, नरेंद्र ठाकरे, योगेश बोरसे यांनी संशयावरून कांचननगर, हरीओम नगर, वाल्मिकनगर परिसरात सापळा रचला.
वाल्मिकनगर रस्त्यावर घेतले ताब्यात
पथकाने दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास पायी घराकडे जात असलेल्या डिगंबर मानकर याला ताब्यात घेतले. त्याला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसीखाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली परंतु चोरलेल्या रकमेतून घरासाठी धान्य घेतल्याचे सांगितले. काही वेळानंतर त्याने चोरीची रक्कम काढून दिली.
सावदा पोलिसांच्या केले स्वाधीन
शनिपेठ पोलिसांनी डिगंबर मानकर याला पकडल्याची माहिती सावदा पोलिसांना दिली. सायंकाळी त्याला सावदा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.