वृद्धाला लुबाडले ; तोतया पोलिस धुळे गुन्हे शाखेच्या जाळ्यात

भुसावळ/धुळे : पोलिस असल्याची बतावणी करीत तोतयांनी शिरपूर शहरात वृद्धाला लुबाडले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. धुळे गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे दोघा तोतयांच्या मुसक्या आवळल्या आहेत. जावेद अली नौशाद अली (43, रा.मुस्लीम कॉलनी, खडका, भुसावळ) व जफर हुसैन हजन हुसैन (39, परळी, जि.बीड) अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत.

शिरपूरात पोलिस असल्याची बतावणी करीत लुबाडले
शिरपूर शहरातील करवंद नाक्याजवळ पोलिस असल्याची बतावणी करीत दोघा संशयीतांनी विजय वाल्मिक देसले (रा.शेरुळ, ता.मालेगाव) यांना लुबाडले होते. देसले हे आपल्या मुलीला भेटण्यासाठी शिरपूर येथे आल्यानंतर बुधवार, 9 फेब्रुवारी रोजी करवंद नाक्यावरील रीलायन्स ट्रेंड जवळ किराणा बाजार करून बसलेले असतांना अवैध गांजाची वाहतूक होत असल्याने झडती घेण्याचे सांगून विश्वास संपादन करीत खिशातील पैसे, घड्याळ व हातातील सोन्याची अंगठी पिशवीत ठेवण्याचे सांगून हातचलाखी करीत चार हजार रुपये रोख, घड्याळ व साडे सहा ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी मिळून 33 हजार 560 रुपयांचा ऐवज लांबवण्यात आला होता. दरम्यान, धुळे येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धुळे शहरातील आझादनगर परीसरातून दुचाकीने फिरणार्‍या संशयीतांच्या मुसक्या आवळत ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. संशयीतांना शिरपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.