परभणी – पुण्याहून नांदेडला जाण्यासाठी लोकमान्य टिळक एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या एका वयोवृद्ध दाम्पत्याला गंडा घालणाऱ्या चोरट्यांना पुर्णा पोलिसांनी गजाआड केले. चोरट्यांकडून मोबाईल व सोन्याचांदीचे दागिने असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नांदेड येथील प्रतिभा श्रीकांत भालेराव व त्यांचे पती ८ ऑगस्टला कुर्ला-नांदेड एक्स्प्रेसने पुण्याहून नांदेडला जाण्यासाठी लोकमान्य टिळक एक्स्प्रेसने प्रवास करीत होते. गाडी परळी-पूर्णा स्थानकादरम्यान आली असता, मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी त्यांची बॅग पळवल्याचे त्यांच्या लक्षात आले.
पुर्णा पोलीस ठाण्याचे गुन्हा शोध शाखेचे उपनिरीक्षक चंद्रकांत पवार यांनी पथकातील किशोर कवठेकर, समीर पठाण, शेखर कलवले, लतिफ पठाण, चंद्रमुनी हानवते, मिलींद कांबळे यांनी रेल्वे स्थानकापासून जवळ असलेल्या भागात आरोपींचा शोध सुरू केला. त्यांना रेल्वे वसाहतीजवळ काही जण संशयित आढळून आले. त्या तिन जणांना ताब्यात घेऊन त्यांनी चौकशी केली. त्यांनी गाडीत चोरलेल्या बॅगची कबुली दिली.
आरोपी राजेशकुमार प्रेमसिंग परमार (रा.पंजाब) व किशोर शंकर तापडीया आणि विठ्ठल आश्रोबा सातपुते (रा.हिंगोली) यांच्याकडून चोरीला गेलेली बॅग जप्त केली. या तिन्ही आरोपी विरोधात पूर्णा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.