मुंबई । दक्षिण मुंबईतील चर्नीरोडजवळच्या ठाकूरद्वारमध्ये राहणार्या वृद्ध दाम्पत्याने राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची परवानगी मागितल्यानंतर त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे निराश झालेल्या या दाम्पत्याने स्वत:च्या हत्येची योजना आखली आहे. नारायण आणि इरावती लवाटे असे त्या दाम्पत्याची नावे आहेत. इरावती यांनी त्यांचे पती नारायण यांना याबाबत पत्र लिहून हत्या करण्याची मागणी केली आहे. माझ्या हत्येनंतर तुम्हालाही मृत्युदंडाची शिक्षा होईल, असेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.
नारायण आणि इरावती लवाटे हे दाम्पत्य राहते. या दाम्पत्याला मूल नाही तसेच कुठला गंभीर आजारही नाही. वयानुसार समाजासाठी आपला काहीही उपयोग नसून स्वतःचा सांभाळ करण्यासाठी आपण आता सक्षम नाही, असे या दाम्पत्याला वाटत आहे. नर्स अरुणा शानबाग यांना इच्छामरण मिळावे, यासाठी केईएम हॉस्पिटलने दया याचिका दाखल केली होती. ते वाचून या दाम्पत्याने इच्छामरणाचा विचार केला होता. 21 डिसेंबरला या दाम्पत्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे इच्छामरणाची मागणी केली होती. 31 मार्च 2018 पर्यंत उत्तराची वाट पाहू, असे या दाम्पत्याने पत्रात नमूद केले होते. पण पत्र पाठवून दोन महिने उलटत असून, त्यांचे पत्र गांभीर्याने घेतले नसल्याने त्यांनी एकमेकांच्या हत्येची योजना आखली आहे.
पतीला लिहिले मार्मिक पत्र
इरावती यांनी पती नारायण यांना मार्मिक पत्र लिहिले आहे. 31 मार्चनंतर मला गळा दाबून मारू शकता, त्यानंतर तुम्हालाही मृत्युदंडाची शिक्षा होईल, असे इरावती यांनी पत्रात लिहिले आहे. आपण दोघांनीही इच्छामरणाची मागणी केली आहे. पण आपली मागणी राष्ट्रपती ऐकणार नाहीत, असे मला वाटते. यामुळे 3 मार्चनंतर तुम्ही मला गळा दाबून मारू शकता, हाच एक पर्याय मला दिसत आहे. मला मारणे ही एक योजनापूर्ण हत्या असेल, ज्यामुळे न्यायालय तुम्हाला गुन्हेगार ठरवून फाशीची शिक्षा देईल, असेही इरावती यांनी पत्रात लिहिले आहे. लग्नाच्या पहिल्याच वर्षी लवाटे दाम्पत्यानी मूल जन्माला घालायचे नाही, असा निर्णय घेतला होता. इच्छामरणाचा कायदा व्हावा म्हणून हे दाम्पत्य 30 वर्षे पाठपुरावा करत आहे.