पाचोरा तालुक्यातील अंतुली बुद्रूक येथील घटना ; पाच जणांची निर्दोष मुक्तता
जळगाव – पाचोरा तालुक्यातील अंतुली बुद्रूक येथील प्रकाश केशव महाजन (वय 62) व विजया प्रकाश महाजन (वय 56) या वृध्द दाम्पत्याला छायाचित्र काढण्याच्या कारणावरुन लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देवून वृध्देच्या गळ्यातील 11 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन ओढून नेली होती. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. या खटल्यात जिल्हा न्यायालयाने आठ पैकी तिघांना सश्रम कारावास व पाच जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. न्या. पी.वाय.लाडेकर यांच्या न्यायालयाने गुरुवारी हा निकाल दिला.
अंतुली येथील प्रकाश महाजन व त्यांची पत्नी विजया हे दोन्ही 27 मे 2015 रोजी शेतात काम करत होते. यादरम्यान त्याच्या शेतात बांधावर एक ट्रॅक्टर आले. त्या ट्रॅक्टरचा महाजन यांनी छायाचित्र काढले. यानंतर चालकाचा छायाचित्र काढत असतांना बांधावरील माधव चिंधा पाटील यांनी महाजन यांना फोटा काढू नको, फोटो काढले तर तुला ट्रॅक्टरखाली चिरडून मारुन टाकेल, अशी धमकी देत त्यांच्यासह इतरांनी लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. यावेळी पत्नी विजया यांनाही मारहाण करुन जखमी केले व त्याच्या गळ्यातील 11 ग्रॅमची सोन्याची चैन ओढून नेली होती. याप्रकरणी प्रकाश महाजन यांच्या फिर्यादीवरुन पाचोरा पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. तपासधिकारी एस.आर.ब्राम्हणे यांनी तपास करुन पाचोरा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
खटला सुरु असतांना एका आरोपीचा मृत्यू
या खटल्याचे कामकाज जिल्हा न्यायालयातील न्या. पी.वाय. लाडेकर यांच्या न्यायालयात चालले. यात सरकारपक्षातर्फे मूळ फिर्यादी, त्यांची पत्नी, पंच, जखमींवर उपचार करणारे डॉ. व्ही.आर.कुरकुरे, डॉ. गणेश राठोड, तपासअधिकारी एस.आर.ब्राम्हणे अशा नऊ जणांच्या साक्ष नोंदविण्यात आल्या. खटल्या दरम्यान आरोपी क्रमांक 1 बाबुलाल गोबजी पाटील (वय 78) यांचा मृत्यू झाला होता.
दोघा भावंडांसह एकाला सश्रम कारावास
साक्षी तसेच पुराव्याअंती न्या. लाडेकर यांनी आरोपी राहूल धनराज पाटील (वय 28), माधव चिंधा पाटील (वय 38) व हिरामण चिंधा पाटील (वय 46) या तिघांना दोषी धरले तसेच तिघांना कलम 323 सह 34 नुसार तीन महिने सश्रम कारावास व प्रत्येकी पाचशे रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना कारावास, कलम 447 सह 34 नुसार दोन महिने सश्रम कारावास, प्रत्येकी 200 रुपये दंड, दंड न दिल्यास 15 दिवस साधा कारावास, कलम 506 सह 34 नुसार तीन महिने सश्रम कारावास प्रत्येकी पाचशे रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली. तर यातील बाबुलाल पाटील, नामदेव कैलास पाटील (वय 22), चिंधा गोबजी पाटील (वय 85), प्रशांत शिवाजी पाटील (वय 31) व भाऊसाहेबर ओंकार पाटील (वय 29) या जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सरकारपक्षातर्फे अॅड. प्रदीप एम.महाजन, मूळ फिर्यादीतर्फे अॅड. चंद्रकांत शर्मा यांनी काम पाहिले. खटल्याकामी पैरवी अधिकारी अनिल सपकाळे, पाचोरा पोलीस स्टेशनचे केसवॉच सुर्यकांत नाईक यांनी सहकार्य केले.