वेंगसरकर क्रिकेट अ‍ॅकॅडमीच्या मागणी मान्य

0

महासभेत ऐनवेळी प्रस्ताव दाखल

पिंपरी : थेरगाव येथे महापालिका आणि दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन यांच्या वतीने संयुक्त क्रिकेट अकादमी प्रकल्प 2007 पासून कार्यान्वित आहे. अकादमीच्या संचालकांनी स्थापत्य, विद्युत आणि अंतर्गत सजावटीची कामे करण्याची मागणी महापालिकेकडे केली. त्यानुसार महापालिकेतर्फे या अकादमीत पॅव्हेलीयनच्या तळमजला, सीमाभिंतीची उंची वाढविणे तसेच पॅव्हेलीयनच्या पहिल्या व दुस-या मजल्यावरील खोली आणि खुली गच्ची अद्ययावत सुखसोयींनी करण्यात येणार आहे.

संयुक्त क्रिकेट अकादमी
28 फेब्रुवारी रोजी होणा-या महापालिका सभेसमोर ऐनवेळचा विषय म्हणून आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी हा विषय सादर केला आहे. थेरगाव सर्व्हे क्रमांक 9 येथे महापालिका आणि दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन यांच्यावतीने संयुक्त क्रिकेट अकादमी प्रकल्प कार्यान्वित आहे. या अकादमीच्या विकासाचे अधिकार दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनला 30 वर्षे कालावधीसाठी देण्यात आले आहे. शहरातील क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण मिळावे, यादृष्टीने महापालिका आणि वेंगसरकर फाऊंडेशन यांनी संयुक्तपणे क्रिकेट अकादमी स्थापन करून मैदान विकसित करून क्रिकेटपटूंना क्रिकेट प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प कार्यान्वित आहे.

सीमाभिंतीची उंची वाढवणार
या अकादमीमधील पॅव्हेलीयनच्या तळमजल्याचे पूर्णपणे कामकाज व सीमाभिंतीची उंची वाढविण्याचे तसेच पॅव्हेलीयनच्या पहिल्या व दुस-या मजल्यावरील खोली आणि खुली गच्ची अद्ययावत सुखसोयींनी करण्याबाबत क्रिकेट अकादमीच्या संचालकांनी मागणी केली आहे. त्या अनुषंगाने स्थापत्य, विद्युत, अंतर्गत सजावटीची अनुषंगिक कामे करणे आवश्यक आहे. या संयुक्त प्रकल्पाचा हेतू आणि प्रस्तावित कामाची आवश्यकता लक्षात घेता ही कामे करण्याचे ठरले आहे.