नागपूर : आपल्या वेगवान गोलंदाजीने क्रिकेटच्या मैदानात प्रतिस्पर्धी फलंदाजांची दाणादाण उडविणारा विदर्भाचा स्टार गोलंदाज उमेश यादव नागपूर महानगरपालिकेचा स्वच्छता सदिच्छा दूत बनला आहे. त्यामुळे आता उमेश नागपुरकरांना स्वच्छतेबाबत आवाहन करणार आहे. या वृत्ताला नागपूरचे मनपा आयुक्त श्रवण हर्डीकर यांनी दुजोर दिला आहे.
उमेश यादवला महानगरपालिकेच्या स्वच्छता सदिच्छा दूत होण्याबाबत नागपूर महानगरपालिका आयुक्त श्रवण हर्डीकर यांनी विनंती केली होती. आयुक्तांसोबत झालेल्या चर्चेत त्याने त्वरित होकार दिला होता. नागपूर शहरासाठी स्वच्छता भारत या महत्वाच्या अभियानाचा भाग होण्याची संधी मिळाल्याबद्दल उमेशने मनपाचे आभार मानले. आपल्या व्यस्त दैनंदिनीमधून नागपूरकरांसाठी आपण नक्कीच वेळ काढणार असल्याची ग्वाही त्याने दिली.
महापौर प्रविण दटके व मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्वच्छ भारत अभियानासाठी नागपूरचे स्वच्छता सदिच्छा दूत म्हणून सहभागाबद्दल उमेश यादवचे आभार मानले. वेगवान गोलंदाज म्हणून उमेश यादवने विदर्भाची छाप भारतीय संघात उमटविली आहे. भारतीय संघातील ऑरेंजसिटीची शान असलेल्या उमेश यादवच्या सहभागामुळे अभियानाला मोलाची मदत होईल, असा विश्वास मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केला.