भुसावळ : मंगळसूत्र चोरीसह पाकिटमारी, मोबाईल चोरी आदी चार गुन्ह्यातील पाच आरोपींना लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल वसुलही केला आहे. जळगावचे तक्रारदार मनोज राजपूत हे त्यांच्या आईसह 7 डिसेंबर रोजी जळगाव रेल्वे स्थानकावरून लिप्टमधून जात असताना संशयीत आरोपी सुमनबाई प्रताप लोंढे (माणिकबाग, जामनेर) यांनी धक्का मारून तक्रारदाराच्या आईचे मंगळसूत्र लांबवले होते.
यावेळी आरडा-ओरड करून आरोपीला अटक करण्यात आली तर 15 हजारांचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. दुसर्या घटनेत चोपडा तालुक्यातील बीडगावचे तक्रारदार हे 6 डिसेंबर रोजी जळगाव रेल्वे स्थानकावरून गीतांजली एक्स्प्रेसमध्ये चढताना संशयीत आरोपी शेख हकीम उर्फ भुर्या शेख अजगर, (गौसीयानगर, भुसावळ) व समीर खान मजीदखान (जळगाव) यांनी त्यांचे पाकिट लांबवले. पाकिटाता 72 हजार 500 रुपयांची रोकड होती. गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना 8 रोजी अटक करण्यात आली तर 40 हजार रुपये जप्त करण्यात आले. तिसर्या घटनेत तक्रारदार 6 जुलै रोजी लष्कर एक्स्प्रेसने जात असताना आरोपीने एक लाख 39 हजार 500 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व मोबाईल लांबवले होते. या प्रकरणी राजकुमार उर्फ सहादू कडू दवडे (रा.नेपानगर) यास अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून 65 हजारांचे दागिने जप्त करण्यात आले तसेच चौथ्या घटनेत तक्रारदर प्रवाशाकडील 60 हजारांची रोकडसह मोबाईल 16 ऑक्टोबर रोजी चोरीला गेला होता.
या प्रकरणी संशयीत आरोपी निलेश नामदेव धर्माडे (रा.भोरगाव, अमरावती) यास अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून 20 हजारांची रोकड जप्त करण्यात आली.