वेगवेगळ्या योजनांमध्ये महिलेची साडेचौदा लाखांची फसवणूक 

0
चिंचवड पोलिसात नऊ जणांवर गुन्हा दाखल
पिंपरी चिंचवड : वेगवेगळ्या योजनांचे आमिष दाखवून एका महिलेची साडेचौदा लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार चिंचवडमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी नऊ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. गौरी आनंद तोंडारे (वय 37, रा. एकरंग हौसिंग सोसायटी, थेरगाव) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. असे आहेत फसवणुकदारांची नावे…मेकर ऍग्रो इस्टेट प्रा. लिमिटेडचे अध्यक्ष रमेश वळसे पाटील (वय 37), सचिव सुनील देशमुख, संचालक मनोहर शांताराम आंबुलकर (रा. वसई, जि. पालघर), विक्रम चौहान, महालिंग धवन (रा. सौदर्या, जि. बीड), भास्कर बाबूराव लिमकर (रा. मु.पो.कळंब, जि. उस्मानाबाद), श्रीधर हरिश्‍चंद्र खेडेकर (रा. श्रीनगर, पिंपळे गुरव), अ‍ॅड. राजेश्री कोल्हापुरे (रा. शांतीबन सोसायटी, चिंचवडगाव) आणि महेश नागनाथ कोरडे (पत्ता माहिती नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
विविध योजनांमध्ये केली गुंतवणुक…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेकर ऍग्रो इस्टेट प्रा. लिमिटेडचे बिजलीनगर, चिंचवड येथे कार्यालय आहे. या कार्यालयात फिर्यादी गौरी यांना वेगवेगळ्या योजनांच्या  गुंतवणुकीचे आमिष दाखवून 2013 पासून वेळोवेळी 14 लाख 38 हजार 864 रुपयांची गुंतवणूक करायला लावली. तसेच ठरल्याप्रमाणे परतावा आणि मुद्दल परत न देता  फसवणूक केली. तसेच फिर्यादी गौरी यांच्या प्रमाणे अन्य एजंट आणि गुंतवणूकदारांनाही मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करायला लावून ठरल्याप्रमाणे परतावा
न देता फसवणूक केली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव तपास करीत आहेत.