वेडामागचे शहाणपण!

0

काही माणसे ही वेड्यासारखी वागतात. पण त्यांच्या त्या वेडामागे एक शहाणपण दडलेले असते. जाणीवपूर्वक ते वेड्याचे सोंग आणून आपला कार्यभाग साधत असतात. असा वेडापणा करणारे किंवा वेडेपणा करत आहोत असे दाखवणारे जेव्हा राजकारणी असतात तेव्हा तर नक्कीच त्यांचा हिडन अजेंडा वेगळाच असतो. आता भाजपचे खासदार साक्षीमहाराज यांचे पाहा. ते नेहमीच असे काही बोलतात की ज्याने वाद होतोच होतो. विशेषत: विषय संवेदनशील असेल तर साक्षीमहाराजांना बहुधा अधिकच चेव येतो. ते फुल फॉर्मात येतात. आणि मग इतर ज्या विषयांवर बोलायलाही घाबरतात त्या विषयांवर ते जरा जास्तच बोलतात. तेही असे की त्यामुळे कोणाच्यातरी संवेदना दुखावल्याच गेल्या पाहिजेत!

आता ताजे उदाहरण आहे ते कबरस्तानचे. इस्लाम, ख्रिश्चन धर्मांमध्ये मृतदेहावर जमिनीत दफन करुन अंत्यसंस्कार केले जातात. साक्षी महाराजांना यावेळी दफनाची प्रथाच चुकीची असल्याचा साक्षात्कार झाला आहे. दिवसेंदिवस दफनभूमीची जागा कमी पडत आहे ही वस्तुस्थिती आहे. मात्र त्यावर त्या धर्मातील लोक काही काळाने त्याच जागी पुन्हा दफन करुन जागेच्या पुनर्वापरासारखे तोडगे काढत असतात. मात्र साक्षीमहाराजांना तोडगे-बिगडे पसंत नसावेतच. त्यांनी भन्नाट डोके चालवत पुढचा तोडगा देऊन टाकला आहे. जागेची कमतरता लक्षात घेऊन आता मृत्यूनंतर कोणाचेच दफन केलेच जाऊ नये, अगदी मुसलमान असले तरीही त्यांचेही दहनच केले जावे, असे त्यांनी सुचवले आहे.

साक्षीमहाराज पहिल्यांदाच असे काही बोलले असे नाही. ते असे काही तरी भलतेच बोलून वाद निर्माण करण्यासाठीच ओळखले जातात. विशेषत: प्रखर हिंदूत्वाचा अर्थ मुसलमानांचा कडवा विरोध असल्याचा त्यांचा ठाम समज असावा. त्यामुळे काही दिवसांनी ते जणू ठरवून मुसलमानांच्याविरोधात बोलतात. कधी इस्लाममध्ये महिलांना जोड्यांचीच किंमत असल्याचे सांगून ते न्यायालयाच्या हस्तक्षेपाची मागणी करतात. तर कधी मुसलमानांचा अल्पसंख्यांक दर्जा काढून घेण्याची मागणी करतात. राहुल गांधींवर राजकीय टीका गैर नाहीच. पण राहुल गांधी हे मांसभक्षक आहेत, त्यांनी केदारनाथांचे दर्शन घेतल्यामुळे भूकंप झाला. नेपाळमधील भूकंपानंतरचे त्यांचे हे बेताल वक्तव्य तर भाजपालाही लाजवणारे होते. मांस खाणारे राहुल गांधी दर्शनाला गेले. त्यामुळे नेपाळला त्रास भोगावा लागला, असे एका खासदाराने बोलणे भूकंपाएवढेच धक्कादायक होते. त्यांच्या या बेतालपणामुळेच तसेच त्यांच्या विचारसरणीमुळे त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त संबोधणे कोणालच धक्कादायक वाटले नाही. वाद मात्र झाला. उत्तरप्रदेशातील मैनपुरी येथे पोलीस लाठीमारात जखमी झालेल्या मुलीला सर्वांसमोर तिची डेनिम ट्राऊझर काढायला लाऊन साक्षीमहाराज महिलांच्या टिकेचे सक्ष्य झाले होते. त्याच साक्षीमहाराजांनी नंतर महिलांवरच हिंदू धर्म रक्षणाची जबाबदारीही टाकली होती. अर्थात त्यासाठी त्यांचा मार्ग हा सरळसाधा नव्हताच. महिलांच्या गौरवाचाही नाहीच. ते म्हणाले होते, हिंदू महिलांना धर्माच्या रक्षणासाठी किमान चार मुलांना जन्म दिलाच पाहिजे!

त्यांचे ताजे दफन नको दहनच पाहिजे हे वक्तव्य या निवडणुकीतील पहिले वादग्रस्त वक्तव्य आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचे चुकत आहे. तुम्ही साक्षीमहाराजांच्या अफाट कर्तृत्वाला कमी लेखत आहात. त्यांनी देशाच्या समस्यांना चार लग्ने आणि चाळीस मुले जन्माला घालणारे जबाबदार असल्याचे ठासून सांगत त्यांनी या निवडणुकीची तुतारी फुंकली होती. तेव्हा त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा विचारही झाला. पण छोटे-मोठे गुन्हे वगैरे गोष्टी साक्षीमहाराजांना अडवू शकत नाही.

 त्यामुळेच आता पुन्हा ते बोललेत. दफन करण्यासाठी जागेची कमतरता पाहता, मृत्यूनंतर कोणाचेही दफन केले गेले नाही पाहिजे. मुसलमान धर्मातील व्यक्तीचेही दहनच केले जावे असे स्पष्ट शब्दात बजावत त्यांनी हिंदू धर्मातील समाधी बांधण्यासही त्यांचा विरोध दर्शवला आहे.

मधल्या काळात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी भाजपाने मुसलमानांना उमेदवारी दिलेली नाही, याबद्दल विचारले असता मुसलमानांना उमेदवारी दिली पाहिजे होती असे म्हटले. भाजपचे मुसलमान नेते मुख्तार अब्बास नकवी यांनीही एकाही मुसलमानाला भाजपने उमेदवारी दिलेली नाही त्याबद्दल खंत व्यक्त केली. आता तुम्हाला वाटेल स्मशान-कबरस्तान वाद ठिक आहे. मानले तो जाणीवपूर्वक आहे. मात्र उमेदवारीची खंत योग्यच ना. पण मगाशी म्हटले तसे राजकारण्यांच्या वेडामागे शंभर टक्के शहाणपण असते. या साऱ्या वक्यव्यामुळे फक्त आणि फक्त मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न असू शकतो.

आता काहींना वाटेल की मग काय गैर आहे. जागेची टंचाई आहेच ना. पण उत्तरप्रदेशात सध्या निवडणुका आहेत. पूर्व उत्तरप्रदेशाच्या रणांगणातील पाचव्या टप्प्याचे मतदान हे 57 टक्केच झाले. वाढले नाही. जास्त वाढले तर परिवर्तन होईल असे मानले जाते. कमी झाले तर जैसे थे स्थितीही राहू शकते. आता उरलेल्या दोन टप्प्यांमध्ये मतांचे ध्रुविकरण व्हावे आणि मतांच्या परिवर्तनाच्या बळावर उत्तरप्रदेशातही सत्ता परिवर्तन व्हावे अशी रणनीती असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर पक्षातील वरिष्ठ नेत्यांची परवानगी नसेल तर साक्षी महाराज काहीही बोलण्याचा वेडेपणा दाखवणारच नाहीत. भीती तिच आहे. वेड्यासारखे बोलल्याचे दाखवत हे मते मिळवण्याचे शहाणपण दाखवतील, नुकसान मात्र देशाचे होईल. तसे होणे कोणालाही परवणारे नाही. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपालाही नाही.