आदिवासी वसतिगृहासह गो शाळेची केली पाहणी ; सत्काराने भारावले सदस्य
भुसावळ- शहरातील वेडीमाता ज्येष्ठ नागरीक संघाची सहल नुकतीच चोपडा तालुक्यातील वेले येथील वृद्धाश्रमात तसेच आदिवासी वसतिगृहात जावून आली. प्रसंगी ज्येष्ठांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठांसह आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांशी हितगुज करीत त्यांच्या भावना जाणून घेतल्या तसेच उपस्थितांचा प्रसंगी सत्कार करण्यात आला. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत गुलाबराव पाटील असून अमर संस्थेतर्फे वृद्धाश्रम तसेच आदिवासी वसतिगृह चालवण्यात येते. ज्येष्ठांनी प्रसंगी संस्थेविषयी माहिती जाणून घेतली तसेच गो शाळेची पाहणीदेखील केली. व्यवस्थापक शेषराव पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. प्रसंगी वेडिमाता ज्येष्ठ नागरीक संघातर्फे संस्थेला 5001 रुपये देणगी स्वरूपात देण्यात आले तसेच भुसावळ शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक दीपक गंधाले, सिद्धीविनायक ग्रुपचे संचालन यतीन ढाके यांच्यातर्फे संस्थेला साबणाची एक पेटी देण्यात आली तर वसंत चौधरी यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना चॉकलेटसह बिस्कीट पुड्यांचे वाटप करण्यात आले. ज्येष्ठ नागरीक संघातर्फे प्रसंगी दुपारच्या वन भोजनाचे आयोजन करण्यात आल्याचे संघाचे अध्यक्ष दत्तात्रय ढाके व उपाध्यक्ष सीताराम भंगाळे कळवतात. सहलीसाठी मनीष ट्रॅव्हल्सचे संचालक सतीश घुले यांचे सहकार्य लाभले.