पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) – वेतनवाढ करार मार्गी लावावा, तसेच निलंबित कामगारांना त्वरीत कामावर रुजू करुन घेण्याच्या मागणीसाठी बजाज कामगारांनी आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. विश्व कल्याण कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून आकुर्डी येथे बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
एप्रिल 2016 पासून वेतनकरार रखडलेला
बजाज ऑटो कंपनी समोरील शहीद दत्तात्रय पाडाळे यांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात येत आहे. बजाज ऑटो कंपनीच्या आकुर्डी व चाकण प्रकल्पातील कामगारांचा एप्रिल 2016 ते मार्च 2019 या कालावधीचा वेतनकरार रखडला आहे. याबाबत व्यवस्थापनासोबत कामगार संघटनेच्या अनेक बैठका होऊनही यावर तोडगा निघाला नाही.
दाव्याला व्यवस्थापनाकडून विलंब
दोन्ही प्रकल्पातील वेतनकरार तसेच 14 बडतर्फ कामगारांना कामावर परत घेण्याच्या मागणीसाठी औद्योगिक न्यायालयात दावे प्रलंबित आहेत. मात्र, व्यवस्थापन जाणीवपूर्वक हे दावे लांबवत असल्याच्या निषेधार्थ बेमुदत उपोषण सुरु करण्यात येत आहे असे, विश्व कल्याण कामगार संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब थोरवे यांनी सांगितले.