पुणे । श्रावण-भाद्रपद हे दोन्ही महिने उल्हास आनंद उत्सवांची रेलचेल घेऊन येतात. त्यात भाद्रपदातील गणेशोत्सव चिमुकल्यांपासून ते थोरांपर्यंत सगळ्यात जास्त आवडीचा. श्रावण सरतो तोच वेध लागतात ते बाप्पांच्या आगमनाचे. या गणेशोत्सवाची सुरुवात पुण्यात झाल्याने पुण्याच्या गणेशोत्सवाची रंगत काही औरच असते. असा हा सर्वांच्या मनाला आनंद देणारा उत्सव यंदा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष म्हणून साजरा होत आहे. त्यानिमित्ताने पुण्यातील मानाच्या गणपतींसह गणेशोत्सवाच्या वाटचालीचा अल्प परिचय.
मानाचा पहिला गणपती कसबा
कर्नाटकातील इंडी येथून आलेल्या ठकार नावाच्या कुटुंबाने, कसबा गणपतीची स्थापना केली. त्यानंतर जिजाबाईंनी या गणपतीसाठी मंदिर बांधले. हा गणपती दगडी गाभा-यात तांदळा स्वरुपात आहे. तांदळा म्हणजे हात पाय असे अवयव नसलेली केवळ मुखवटावजा मूर्ती. संपूर्ण पुण्यात अशा प्रकारची ही मूर्ती एकमेव असण्याचा अंदाज आहे. कसबा गणपतीपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाल्याने कसबा गणपती हा मानाचा पहिला गणपती ठरतो.
धार्मिक भावनेतून वाढवला एकोपा
गणेश पूजनाची परंपरा पूर्वी कौटुंबिक स्वरूपाची होती. जिजाबाईंनी कसब्यातील गणपतीचे मंदिर बांधले आणि पेशव्यांनी त्या गणपतीला मनाचे स्थान मिळवून दिले. नंतर टिळकांनी याच गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप देण्यासाठी भरीव प्रयत्न केले. गणपती महोत्सव सुरू करण्यामागे सर्व जाती धर्मांनी एकत्र यावे, संघटीत व्हावे आणि स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी योगदान द्यावे हा प्रामाणिक उद्देश होता. धार्मिक भावनेतून एकोपा वाढीस लावणे व त्याचा देशहितासाठी उपयोग करून घेणे हे गणेशोत्सव सुरू करण्यामागचे सूत्र होते.
अन् मध्यप्रदेशात पोहचला गणपती
गणेशोत्सवाची पणती पुण्यातील कसबा पेठेत प्रज्वलित झाली आणि तिचा प्रकाश आज केवळ महाराष्ट्रापुरताच मर्यादित न राहता आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि गुजरात यांसारख्या राज्यांमध्ये पोहोचला आहे. इतर राज्यातही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. पण पुण्यातील गणेशोत्सवाची सर मात्र इतर कुठेच येत नाही.
हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक
कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती, केसरी गणपती हे पुण्यातील मानाचे गणपती आहेत. कसबा गणपती हा पहिला मनाचा गणपती आहे. या गणपतीला पुण्याचे ग्रामदैवत म्हणूनही ओळखले जाते. आजही पुण्यामध्ये घरात कोणतेही शुभकार्य असले तरी पहिले आमंत्रण कसबा गणपतीला देतात. तांबडी जोगेश्वरी गणपती दुसरा मानाचा गणपती आहे. पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी देवीच्या मंदिराजवळ या गणपतीची स्थापना झाल्याने या गणपतीला तांबडी जोगेश्वरी गणपती म्हटले जाते. गुरुजी तालीम गणपती हा मानाचा तिसरा गणपती आहे. सुरुवातीला हा गणपती तालीममध्ये बसवला जात असे. परंतु आता तालीम न राहिल्याने तो बाहेर बसविला जातो. टिळकांनी गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वी पाच वर्षे या गणपती उत्सवास सुरुवात झाली. हिंदू मुस्लिम बांधवांनी याची सुरुवात केल्याने या गणपतीला हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जाते.
लोकमान्य टिळकांची परंपरा जपली
तुळशीबाग गणपती हा मानाचा चौथा गणपती आहे. हा गणपती उत्कृष्ठ देखाव्यांसाठी प्रसिद्ध आहे. केसरीवाडा गणपती हा मानाचा पाचवा गणपती आहे. पुण्यातील केसरी वाड्यातील पटांगणात हा गणपती बसविला जातो. पूर्वी इथे टिळकांची भाषणे होत असत. ती परंपरा मंडळाने आजही जपली आहे. आजही केसरीवाड्यात अनेक विद्वानांची भाषणे होतात. याबरोबरच पुण्यातील काही महत्वाचे गणपती आहेत. त्यामध्ये अखिल मंडई मंडळ, हुतात्मा बाबू गेनू मंडळ, छत्रपती राजाराम मंडळ, खजिना विहीर तरुण मंडळ, नातूवाडा मित्र मंडळ, हत्ती गणेश मंडळ, नातूबाग मित्र मंडळ, गरुड गणपती मंडळ, नवजवान मित्र मंडळ, साईनाथ मंडळ ट्रस्ट, सेवा मित्र मंडळ, विश्रामबाग मित्र मंडळ, पेरूगेट चौक मित्र मंडळ, अरुणेश्वर मंडळ, नागनाथपार सार्वजनिक गणपती मंडळ, शनिपार मित्र मंडळ या गणपती मंडळांची नावे सांगता येतील.
विसर्जन मिरवणुकीचा थाट
भाद्रपद शुक्ल चतुर्थीला सुरू होणारा गणेशोत्सव दहा दिवस चालतो. अनंतचतुर्दशीला गणेश विसर्जन करण्यात येते. गणेश विसर्जनाची पुण्यातील धमाल काही औरच असते. अनंतचतुर्दशीला सुरू होणारी मिरवणूक विसर्जनाच्या दुसर्या दिवशी सुद्धा सुरूच असते. मुठा नदीतीरावर पुण्यातील मानाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात येते. गणेशविसर्जनाच्या मिरवणुकीत सुरुवातीला मानाचे पाच गणपती निघतात. त्यांच्या मागे इतर सर्व गणपती मंडळे ठरवून दिलेल्या क्रमाने आपले गणपती आणतात. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा या मिरवणुकीत सर्वात मागे असतात. दगडूशेठ बाप्पांच्या नंतर कोणताही गणपती विसर्जन मिरवणुकीत आणायचा नाही, असा अलिखित नियमच आहे. कारण हा दगडूशेठ बाप्पांचा मान आहे. आणि दगडूशेठ बाप्पांच्या विसर्जनाने संपूर्ण गणेशोत्सवाची सांगता होते.