अश्लील चित्रपट निर्मिती : वेब सीरिज ऑडिशनच्या नावाखाली बोल्ड सीन्स

मुंबई : अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणामध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला मुंबई पोलीस क्राईम ब्रांचनं अटक केली आहे. या प्रकरणी क्राईम ब्रांचनं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कशा पद्धतीने या अश्लील चित्रफिती शूट केल्या जायच्या आणि विकल्या जायच्या, याची मोडस ऑपरेंडीच सांगण्यात आली.
क्राईम ब्रांचकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या नवोदित महिला कलाकारांना वेब सीरिजमध्ये किंवा एखाद्या शॉर्ट स्टोरीजमध्ये ब्रेक देतो असं सांगून बोलावलं जायचं. ऑडिशन, शॉट्स घेण्यासाठी बोलावलं जायचं. त्यात बोल्ड सीन्स करावे लागतील असं सांगितलं जायचं. नंतर त्या बोल्ड सीन्सचं पर्यवसान सेमी न्यूड आणि न्यूड सीन्समध्ये व्हायचं. छोट्या क्लिप्स, शॉर्ट फिल्म्स काही वेबसाईट्स आणि मोबाईल अॅप्सला विकल्या जात होत्या. त्यांचे वेगवेगळे अॅप्स आणि वेबसाईट असायच्या. तिथे या क्लिप्स विकल्या जायच्या. त्यावर या महिला कलाकार आक्षेप घ्यायच्या. अशा काही महिला कलाकार क्राईम ब्रांचला अप्रोच झाल्या. त्यांच्या तक्रारींवरूनच हा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी त्यांचे काही व्हॉट्सअॅप ग्रुप सापडले, इमेल सापडले आहेत, अकाउंटिंग शीट्स सापडल्या आहेत. हॉटशॉट्सवरच्या काही चित्रफीत देखील सापडल्या आहेत. कोर्टाच्या परवानगीने त्यांच्या ऑफिसमध्ये शोध घेतल्यानंतर हे सर्व साहित्य सापडलं. म्हणून तपासानंतर राज कुंद्रा आणि त्यांचे आयटी हेड रायन थॉर्प यांना अटक केली आहे.

 

 

 

.