चोपडा । शहरापासून 5 कि.मी.अतंरावर असलेले वेले गावाजवळ रात्री दीड वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला त्यात एक पुरुष व दोन बालकांचा समावेश आहे . रविवारी दिवसभर या मृतांची ओळख अद्याप पटलेली नव्हती. एवढ्या रात्री दोन मुलांसह पायी जाणारा हा माणूस कुठून आला होता व कुठे जाणार होता या संदर्भात माहिती मिळविण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत. मृत देहांच्या छायाचित्रांच्या आधारावर ही चौकशी सुरु आहे.
मृतदेह चोपड्याच्या रुग्णालयात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास चोपडा- धरणगाव रस्त्यावर वेले गावाच्या पुढे रस्त्याने चालणार्यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक अंदाजे 45 वर्षांचा पुरुष , पाच वर्षांचा मुलगा व आठ वर्षाची मुलगी अशा तिघांचा जागेवरच मृत्यू झाला त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही त्यांचे मृतदेह चोपड्याच्या उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आलेले आहेत. याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशनला वेले येथील पोलीस पाटील नितीन पाटील यांच्या खबरीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या अपघातातील मयत व्यक्ती त्यांच्या पेहरावावरून आदिवासी पावरा समाजाचा असल्याचा अंदाज सहायक पोलिस निरीक्षक रामकृष्ण पवार यांनी व्यक्त केला.