वेल्हावळे येथील विनयभंग प्रकरणात आरोपीस एक वर्षाचा कारावास

0

खेड : महिलांचा विनयभंग करून आपण सहज सुटू अशा भ्रमात राहणार्‍यांना न्यायालयाने चांगलाच झटका दिला आहे. धोंडू विष्णू मराठे (वय – 60 वर्ष, वेल्हावळे ता. खेड. जि. पुणे) याला विवाहितेच्या विनयभंग प्रकरणी बुधवारी (दि. 5) खेड न्यायालयाने दोषी ठरवून एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

घटनेतील फिर्यादी व फिर्यादीचे पती दि. 20 ऑक्टोबर 2013 रोजी शेतामध्ये बैल बांधून दुसरे काम करीत असताना आरोपी घटनास्थळी आला व त्याने बांधलेल्या बैलाचा कासरा कापला. त्याबाबत संबंधित महिलेने त्यास याबाबत जाब विचारला असता सदर आरोपीने चिडून फिर्यादीच्या अंगावर धाव घेतली व अत्यंत आक्षेपार्ह कृत्य करून फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. आरोपी हा फिर्यादीचा नातेवाईकच आहे. चाकण पोलिस ठाण्यात पीडित विवाहितेने या घटनेची फिर्याद नोंदविली होती.

या प्रकरणात न्यायालयात फिर्यादी व घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांची साक्ष महत्त्वाची ठरली. त्यानुसार आरोपी धोंडू मराठे याच्यावरील विनयभंग केल्याचे दोषारोपपत्र सिद्ध झाल्याने खेड न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वाय. जे. तांबोळी न्यायालयाने दोषी ठरवले असून आरोपीस एक वर्ष सक्त कारावास आणि 3000 रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील राजीव एम. तडवी यांनी कामकाज पाहिले. सदर गुन्ह्याचे तपास अधिकारी म्हणून चाकण पोलिस ठाण्याचे तत्कालीन हवालदार मुख्तार शेख यांनी तपास केला. या प्रकरणात चाकण पोलिस ठाण्याचे कोर्ट पोलिस हवालदार संजय मोघे यांनी कामकाज पाहिले.