भोर । पुणे-सातारा महामार्गावर वेळू येथील सेवा रस्त्याच्या पुलावरील रस्ता खचल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. काम निकृष्ट पद्धतीने झाल्याने हा रस्ता खचला असून या कामाची चौकशी करावी, अशी मागणी स्थानिकांसह प्रवाशांकडून केली जात आहे.
शिंदेवाडी ते खेड शिवापूर टोल नाका परिसरात पुणे-सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. याचबरोबर सेवा रस्त्याचे कामही करण्यात येत आहे. वेळू येथे हॉटेल आमंत्रणजवळ ओढ्याचे पाणी वाहून जाण्यासाठी पूर्वीपासून मोरी आहे. काही महिन्यांपूर्वी या मोरीवर पूल बांधून सेवा रस्ता तयार करण्यात आला. मात्र, काही दिवसांतच या पुलावरील रस्ता खचला. सध्या वेळू फाट्यावरील उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे येथील मुख्य रस्त्यावरील वाहतूक सेवा रस्त्याने वळविण्यात येणार आहे. त्यातच हा पूल खचल्याने याठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नागरिक व्यक्त करत आहेत.