भारतीय संस्कृतीत पुरातन काळापासून वेळेचे महत्त्व सांगितलेले आहे. शालेय जीवनात आपण वेळेचे महत्त्व जाणून न घेता त्याचा अपव्यय म्हणजे वाया घालवत राहिलो, तर भविष्यात यशस्वी जीवन कधीच जगू शकत नाही. जगात कुणी श्रीमंत असतील वा गरीब असतील सगळ्याजवळ वेळ मात्र समसमान आहे. जे कुणी वेळेचा सदुपयोग करतील तेच जीवनात प्रगती करू शकतील. जगात तीन गोष्टी प्रसिद्ध आहेत ज्या की एकदा गेल्यानंतर परत मिळवता येत नाहीत. त्या म्हणजे धनुष्यातून सुटलेला बाण, तोंडातून बाहेर पडलेला शब्द आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे गेलेली वेळ. आजची गेलेली वेळ कितीही पैसा खर्च केला आणि कितीही धडपड केली, तरी परत मिळवता येत नाही. त्यामुळे आपणाजवळ उपलब्ध असलेल्या वेळेचे योग्य नियोजन करता येणे आवश्यक आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपी जाईपर्यंत उपलब्ध वेळाचे वेळापत्रक तयार करावे. ज्याप्रकारे शाळेतील वेळापत्रकाप्रमाणे तासिका आणि अभ्यासक्रम यांचे नियोजन केले जाते. त्यामुळेच शाळेतील सर्व प्रक्रिया योग्य पद्धतीने घडत असतात. आपल्या जीवनातील सकाळी झोपेतून उठणे, खाणे, खेळणे, शाळा, शिकवणी, टीव्ही पाहणे आणि अभ्यास करणे या सर्व क्रियांच्या वेळा वेळापत्रकात नमूद करून त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न केल्यास वर्षभरात ठरवलेली सारेच ध्येय साध्य होताना दिसून येतात. फक्त दहावी आणि बारावी हे अतिमहत्त्वाचे वर्ष आहे म्हणून बाकीच्या वर्षात अभ्यास न करता याच वर्षात खूप अभ्यास केल्याने यश मिळत नाही. अभ्यासात सातत्य आणि नियामितपणा ठेवल्यास महत्त्वाच्या वर्षी कोणत्याही विषयाची भीती वाटत नाही आणि अभ्यास डोईजड वाटत नाही. मित्रांशी गप्पा मारत बसणे, जास्त वेळ टीव्ही पाहणे आणि खेळणे इत्यादी प्रकारात वेळेचे नियोजन केल्यास त्याचा नक्कीच उपयोग होतो. आपल्या मेंदूला आणि मनाला वेळापत्रकाची सवय लागली की, हे काम पूर्ण करा, अशी म्हणण्याची वेळ कोणावरसुद्धा येणार नाही.
युवकाचे वेळेकडे दुर्लक्ष :-
भारतातील युवक आपला जास्तीत जास्त वेळ वाया घालवतात असे निदर्शनास येते. कारण आज भारतात बेरोजगार युवकाची संख्या भरपूर आहे. त्यांच्या हाताला काही काम नाही. त्यामुळे ते आपला भरपूर वेळ रिकामा घालवितात. काही युवक रिकामटेकडे फिरत राहतात, कोणतेच काम करीत नाही. तर काही युवक व्यसनाच्या आहारी गेली आहेत. गुटखा खाणे, तंबाखू खाणे, दारू पिण्याच्या व्यसनात पार बुडून गेली आहेत. एक तर काम करत नाहीत आणि पैसा उडवत राहणे हेच एकमेव त्यांचा धंदा बनला आहे. सध्या तर स्मार्ट फोनमुळे त्यांचा पूर्ण वेळ वाया जात आहे. नेहमी त्या फोनवरील फेसबुक, व्हॉट्सअॅप किंवा ट्विटर यासारख्या सोशलच्या साइटवर दिवसभर गप्पा मारत आहेत किंवा कैंडी क्रश सारखे खेळत आपला अमूल्य वेळ बर्बाद करत आहेत. या मोबाइल आणि फ्री नेटवर्कमुळे मी बेरोजगार आहे याची जाणीवदेखील त्यांना होत नाही असे वक्त्यव्य एका तज्ञाने केले आहे, ते काही चूक नाही. वाचन करून एखादी स्पर्धा परीक्षा यशस्वी करायचे सोडून भलतेच काम करत आहेत त्यामुळे त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे असे वाटत नाही. तरुणांनी वेळीच जागे होऊन आपल्या वेळेचे नियोजन केले, तर भविष्यकाळ नक्कीच उज्ज्वल असेल. अन्यथा जीवनात सर्वत्र अंधकार असेल. वेळ निघून गेल्यानंतर रडत बसण्यापेक्षा वेळीच सावध होणे आवश्यक आहे.
महिला वर्ग :-
वेळ वाया घालवण्यात महिला वर्ग काही मागे नाहीत. देवपूजेमध्ये यांचा सर्वात जास्त वेळ जातो. सकाळी मुलांची शाळेला जाण्याची घाई, नवर्याला ऑफिसला जायची घाई आणि त्यात महिला वर्ग जवळपास एक तास पूजेत वेळ घालवतात. त्यामुळे सर्वांची एकप्रकारे तारांबळ उडते. या गोष्टीचे भान महिलांनी ठेवणे आवश्यक आहे. काही काही महिला मोबाइलवर इतका वेळ बोलतात की, त्याचे त्यांना भान राहत नाही. म्हणून मोबाइलवर बोलताना वेळ आणि काळ याचे ही भान ठेवणे आवश्यक आहे. मुलांच्या नंतर टीव्ही पाहण्यात महिला आघाडीवर असतात. सध्या टीव्हीवर महिलासाठी अनेक मालिका चालू आहेत. कधी कधी त्या मालिका पाहून तेसुद्धा मालिकेतल्या पात्राप्रमाणे वागतात की काय अशी शंका येते. सर्वच महिला असे वागत नाहीत पण जे असे वागतात त्यांनी आपल्या वर्तणुकीमध्ये सुधारणा करावी आणि आपला रिकामा वेळ पुस्तक वाचन करण्यात घालवावा म्हणजे वेळ सत्कारणी लागेल. आपण वेळेचे महत्त्व जाणून घेतलात तर घरातील प्रत्येक सदस्य वेळेचे महत्त्व जाणून घेतील, असे वाटते.
– नागोराव सा. येवतीकर
सामाजिक कार्यकर्ते ता. धर्माबाद
9423625769