जळगाव। विविध विद्याशाखांच्या दि. 22 मार्च/एप्रिल/मे, 2017 मध्ये घेण्यात आलेल्या 783 परीक्षांपौकी 580 परीक्षांचे निकाल 30 दिवसांच्या आत तर 203 परीक्षांचे निकाल 45 दिवसांच्या आत जाहिर करणारे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे महाराष्ट्रातील अग्रेसर विद्यापीठ ठरले आहे. विशेष म्हणजे विद्याथ्र्यांची पुढील शिक्षणाची संधी जाऊ नये यासाठी यावर्षी प्रथमच पुनर्मूल्यांकनासाठी जलदगती (फास्टट्रॅक) पध्दतीचा अवलंब करुन विद्यापीठाने विद्याथ्र्यांना सुखद आश्चर्याचा धक्का दिला. मुदतीच्या आत परीक्षांचे निकाल जाहिर करुन विद्यापीठाने आपला स्वत:चा उमवि पॅटर्न निर्माण केला आहे.
जलदगती पद्धतीचा केला अवलंब
विद्यापीठात विविध विद्याशाखेतंर्गत मार्च/एप्रिल/मे, 2017 मध्ये 783 परीक्षांसाठी 1 लाख 58 हजार विद्यार्थी बसले होते. 17 मार्च ते 6 जून, 2017 या कालावधीत 82 दिवसात सर्व परीक्षा सुरळीत पार पडल्या. एम.ए.,एम.कॉम., एम.एस्सी., विधी तसेच अभियांत्रिकी आणि औषधीनिर्माणशास्त्र पदवी व पदव्युत्तर या अभ्यासक्रमांच्या 1665 विषयांच्या प्रश्नपत्रिकांचे वितरण ऑनलाईन (डिजिटल एक्झमिनेशन पेपर डिलीव्हरी सिस्टीम) करण्यात आले. तर उर्वरित अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर पोहचविण्यात आल्या.
कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी प्रारंभापासून परीक्षांचे निकाल वेळेवर लावावेत यासाठी सर्व प्रकारच्या सूचना परीक्षा व मूल्यमापन मंडळाला दिल्या होत्या. कुलगुरुंच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.डी.एन.गुजराथी यांच्या सहकार्याने सर्व उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन वेळेच्या आत करण्यात आले. उत्तरपत्रिकांचे ऑनस्क्रीन मूल्यमापन करण्यासाठी विद्यापीठाने धुळे जिल्हयात सहा, नंदूरबार जिल्हयात एक आणि जळगाव जिल्हयात चार अशी एकूण अकरा मूल्यांकन केंद्रे निश्चित केली. अभियांत्रिकी व तांत्रिकी, शिक्षणशास्त्र, विधी, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखांच्या पदवी, पदव्युत्तर वर्ग, बी.एस्सी. आदी विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे सुमारे 3 लाख 95 हजार 426 उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन ऑनलाईन करण्यात आले तर 70 हजार 396 उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन ऑनलाईन करण्यात आले. उर्वरित विद्याशाखांच्या व काही अभ्यासक्रमांच्या 2 लाख 13 हजार 898 उत्तरपत्रिका पारंपारिक पध्दतीने तपासण्यासाठी विद्यापीठात केंद्रीय मूल्यांकन प्रकल्प आयोजित करुन मूल्यांकन करण्यात आले.
मूल्यांकनाच्या या कामासाठी सर्व प्राध्यापकांचे विद्यापीठाला अत्यंत चांगले सहकार्य लाभले. त्यामुळे बहुतांश निकाल 20 ते 30 दिवसांच्या आत जाहिर करण्यात आले. विद्यार्थी हित लक्षात घेवून विशेषत: एम.एस्सी.प्रवेशासाठी निर्धारीत मुदतीच्या आत विद्याथ्र्यांना अर्ज करता यावे यासाठी बी.एस्सी. अंतिम वर्षाच्या पुनर्मूल्यांकनासाठी यावर्षी प्रथमच जलदगती (फास्टट्रॅक) पध्दतीचा अवलंब करण्यात आला. अभियांत्रिकी, औषधीनिर्माणशास्त्र, विधी आणि वास्तुशास्त्र या व्यतिरिक्त इतर सर्व विषयांच्या पुनर्मूल्यांकनाचे निकालही जाहिर झाले आहेत. विशेष म्हणजे पुढील परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या आत हे निकाल जाहिर झाले आहेत. अभियांत्रिकी, औषधीनिर्माणशास्त्र, विधी आणि वास्तुशास्त्र यांच्या पुनर्मूल्यांकनाचे निकालही पुढील परीक्षा अर्ज भरण्याच्या आत जाहिर केले जातील अशी माहिती डॉ.गुजराथी यांनी दिली. उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत (फोटो कॉपी) मागणाज्या विद्याथ्र्यांना मोबाईलवर संदेश पाठवून ऑनलाईन उपलब्ध करुन दिली जात आहे.