भुसावळ । उतारवयात येणारे बहिरेपण हे वयाबरोबर तसेच आपण नोकरी करत असलेल्या परिस्थितीवर देखील अवलंबून असते. यामुळे नोकरीच्या ठिकाणी योग्य काळजी घेतली तर उतारवयात येणारा बहिरेपणा नक्कीच आटोक्यात येण्यास मदत होईल, असा सल्ला ईएनटी तज्ञ डॉ. चैताली झांबरे यांनी दिला. जळगाव रोड परिसर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आयोजित व्याख्यानात ते मार्गदर्शन करतांना बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष धनराज पाटील, सचिव प्रभाकर झांबरे, मंदाकिनी अत्तरदे आदी उपस्थित होते.
जेष्ठांच्या विविध शंकांची दिली समाधानकारक उत्तरे
विशेष आरोग्य वर्ष -2017 या अभियाना अंतर्गत जेष्ठ नागरिक संघ गणेश कॉलनी आणि परिसर आयोजित वृद्धापकाळ-बहिरेपणा या विषयावर ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, आता उतारवयात बहिरेपणा सुधारण्यासाठी नवीन पद्धती विकसित झाल्या असून त्या फार कमी त्रासदायक आहेत. कधीही कानाच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका. कधीही कान दुखण्यावर घरगुती उपाय करू नका. कानात तेल टाकणे कटाक्षणे टाळावे. डॉ. झांबरे यांना विविध शंका आणि प्रश्नाची विचारणा केली. या प्रश्नावर डॉ. झांबरे यांनी सरळ-सोप्या भाषेत जेष्ठाच्या शंकेचे निरसन केले. कर्ण माशिनीचा वापर कसा करावा, डिजीटल मशिनीचे फायदे आदी विषयांवर सखोल चर्चा झाली. यावेळी विश्वनाथ वाणी, पुरुषोत्तम कुलकर्णी, विठ्ठल पाटील, यशवंत वारके, मालती जगताप, सुनंदा जंगले, इंदू बहाले, लता चौधरी, मधुकर जगताप, मुरलीधर इसे, शरद कोलाडकर आदी जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्तविक धनराज पाटील यांनी, आभार प्रभाकर झांबरे तर स्वागत गीत यमासा भावसार यांनी केले.