वेळ पडल्यास स्वबळावर लढणार

0

काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे यांचे प्रतिपादन

मुरबाड । मुरबाड तालुक्यात तसेच ठाणे जिल्ह्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजप वगळता सर्व घटक पक्षांची युती करण्यास इंदिरा काँग्रेस पक्ष तयार आहे. अथवा तसे न झाल्यास स्वबळावर निवडणूक लढणार असे प्रतिपादन माजी खासदार तथा ठाणे जिल्हा (ग्रामीण) काँग्रेस अध्यक्ष सुरेश टावरे यांनी मुरबाड काँग्रेस भुवन येथे शुक्रवारी आयोजित केलेल्या काँग्रेस मेळाव्यात प्रतिपादन केले. या वेळी व्यासपिठावर काँग्रेस ज्येष्ठ नेते मल्हारी भावार्थे, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. पुंडलिक चहाड, मुरबाड तालुका काँग्रेस कृष्णकांत तुपे, ठाणे जिल्हा पर्यावरण अध्यक्ष नरेश मोरे, तानाजी घागस, मुरबाड शहर अध्यक्ष योगेश गुजरे, नगरसेवक रवींद्र देसले, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष गुलजार पटेल, प्रकाश घोलप, यांचे सह इंदिरा काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेळाव्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची नावे पुढे आली आहेत. नरेश मोरे, गुलजार पटेल, कृष्णकांत तुपे, तानाजी घागास, मधुकर देसले, गुरुनाथ एगडे, ज्योस्त्ना विशे, सारिका भालके, सुधाकर शेळके यांच्यासह जवळपास २४ उमेदवारांनी इच्छुक उमेदवारी म्हणून मागणी केली आहे.

माजी खासदार सुरेश टावरे पुढे म्हणाले की आपण संपूर्ण ठाणे जिल्ह्यात चाचपणी करत आहोत की भाजप पक्ष वगळता जे जे घटक पक्ष आपल्याकडे येतील. त्यांच्याबरोबर युती करू जर तसे झाले नाही तर सर्व कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढण्यासाठी आतापासून कामाला लागा. तसेच इंदिरा काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्यात होणार्‍या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत परिवर्तन घडवणारच असे संकेत टावरे यांनी देताच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.