वेश्या व्यवसायासाठी कॉलसेंटर चालविणार्‍यांना पोलिस कोठडी

0

पुणे । वेश्या व्यावसायाचे कॉलसेंटर चालवून विविध वेबसाइटवर ग्राहक मिळण्यासाठी मोबाइल नंबर, अश्‍लिल फोटो, मजकुर अपलोड करून ग्राहकांना तरुणी पुरवून उपजीविका भागविणार्‍या तिघांच्या पोलिस कोठडीत 15 डिसेंबरपर्यंत वाढ करण्याचा आदेश दिला आहे.

श्रीकांत कालीदास तुळजापुरे (27, रा. अक्कलकोट, सोलापूर) सागर स्वामीनाथ अंबाडे (24, रा. किनी, सोलापूर) आणि संतोषणी कैलासचंद्रा शाहु (26, रा. वडगावशेरी, मूळ. ओरिसा) अशी पोलिस कोठडीत वाढ झालेल्या तिघांची नावे आहेत. मुख्य आरोपी अजय उर्फ रूद्रमणी श्रीशैल्य हिरेमठ (28, अफजलपूर, गुलबर्गा) तसेच गणेश आणि प्रताप नावाच्या आरोपींचा पोलिस शोध घेत आहे. सामाजिक सुरक्षा विभागाने वडगावशेरी येथील महादेवनगर येथे छापा टाकून तिघांना अटक केली होती. यावेळी त्यांच्या ताब्यातून 13 मोबाइल हस्तगत करण्यात आले. यातील दहा मोबाईल वेबसाइटवर वापरण्यात आले होते. हिरेमठ याने संतोषणीचे बनावट आधारकार्ड बनविले आहे, ते कोठे बनविले, त्यांचे कोणी साथीदार आहेत का?, विविध संकेतस्थळाचा वापर याबाबत तपास करण्यासाठी, बँक खात्याची माहिती जाणून घेण्यासाठी सरकारी वकील वामन कोळी यांनी पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली.