वेश्या व्यवसायास प्रवृत्त करणार्‍या खडकीच्या महिलेस सक्त मजुरी

0

खडकी । एका अल्पवयीन मुलीसह विवाहीत महिलेस वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या आरोपी महिलेस खडकी न्यायालयाने तीन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. वीणा सुभाष भोसले(वय 28, रा.माण, ता.मुळशी, जि.पुणे) असे आरोपी महिलेचे नाव आहे. खडकी न्यायालयाचे न्यायाधीश सोपान राचकर यांनी ही शिक्षा सुनावली.

असा रचला सापळा
सामाजिक सुरक्षा गुन्हे शाखेकडून 11 नोव्हेंबर 2013 रोजी या गुन्ह्याप्रकरणी खडकी पोलिसांना माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक (गुन्हे)निशिकांत भुजबळ व सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश कडू यांनी बोपोडी मानाजी बागे समोरील कुंदन-कुशलनगरकडे जाणार्‍या रस्त्यावर सापळा रचून बनावट ग्राहकांमार्फत आरोपी भोसले यांना बोलावून घेतले. भोसले तेथे आल्यावर त्यांनी खडकीतील सदर अल्पवयीन मुलगी व विवाहित महिलेस बोलावून घेतले, पैशाचा व्यवहार ठरल्यानंतर पोलिसांनी आरोपी भोसलेस रंगेहाथ पकडले व अटक केली.

देहविक्रयातून उदरनिर्वाह
कारवाई अंतर्गत पोलिसांनी अल्पवयीन मुलीची रवाणगी सुधारगृहात केली तर विवाहीत महिलेला तिच्या कुटुंबीयांच्या हवाली केले. आरोपी भोसले ही गरजू व गरीब मुली आणि महिलांशी जवळीक निर्माण करत त्यांना पैशाचा मोह दाखवत वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करीत असे. ग्राहकाकडून मिळणार्‍या पैशातून निम्मे पैसे आरोपी स्वतःकडे ठेवत त्यातून आपला उदरनिर्वाह करीत असे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर चार वर्षांनी न्यायालयाने आपला निकाल सुनावला. या खटल्यात सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. आम्रपाली कस्तुरे
यांनी कामकाज पाहिले.