वेस्टर्न इंडिया फोर्जिंगमधील कामगारांचे आंदोलन

0

शिक्रापूर । सणसवाडी येथील वेस्टर्न इंडिया फोर्जिंगमधील कंपनीत मागील एक वर्षांपासून वेतनवाढीच्या करारावर व्यवस्थापनाकडून कोणतेही कामगार हिताचे निर्णय हाती घेतले नाहीत. याच्या निषेधार्थ भारतीय कामगार संघटनेच्या कामगारांनी कंपनीत काळी फित आणि प्रवेशव्दारवर काळे झेंडे लावून आंदोलन सुरू केले आहे.

या कंपनीत मागील दहा वर्षांपासून कामगार काम करत आहेत. 1 जुलै 2016 पासून कंपनीकडे विविध मागण्यांचा वेतनवाढीचा करार सादर केला आहे. मात्र, यावर कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटना यांत बैठका घेऊनही कोणताच ठोस निर्णय घेतला जात नाही. याबाबत कामगार उपआयुक्त पुणे यांच्याकडे कामगार संघटनेच्या वतीने प्रकरण दाखल करण्यात आले आहे. परंतु व्यस्थापनाच्या वतीने तिथेही काही निर्णय घेतला गेला नाही. या कंपनीत मोठ्या संख्येने कामगार आहेत. या कामगारांमध्ये सध्या असंतोषाचे वातावरण आहे. याबाबत कंपनी व्यवस्थापनाने लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कामगार संघटनेने दिला आहे. याबाबत कंपनी मनुष्यबळ विकास विभागाशी संपर्क केला असता कंपनीची व फोर्जिंग इंडस्ट्रीजची सध्या अवस्था बिकट आहे. व्यस्थापनाकडून कामगार प्रतिनिधींशी चर्चा केली असून कामगारांच्या अव्यवहार्य मागण्या आहेत. त्यामुळे वेतनवाढीच्या करारास विलंब होत आहे. याबाबत कामगार आयुक्त कार्यालयात चर्चा सुरू आहे. कामगार प्रतिनिधींकडून कंपनी व कामगार हिताचा विचार व्हावा, असे कंपनीकडून समजते.