लोणावळा : वेहेरगाव गावात एकवीरा देवीच्या गडावर दर्शनासाठी येणारे भाविक व कार्ला लेणी पाहण्यासाठी येणारे पर्यटक यांच्याकडून वेहेरगाव संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून लाखो रुपयांचा उपद्रव शुल्क वसूल केले जात आहे. मात्र त्याचा विनियोग परिसराच्या साफसफाई व संरक्षणासाठी होत नसल्याने ही वसुली म्हणजे उपद्रवाच्या नावाखाली भाविकांची लूट असल्याची चर्चा सध्या वेहेरगावात रंगली आहे. वेहेरगावात संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून पाच वर्षापासून ही रक्कम वसुली केली जात आहे.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र. एफडीएम 2011/प्र.क्र.100/फ-2 अन्वेय एकवीरा देवी लेणी परिसराची साफ सफाई व स्वच्छता करणे, संरक्षण करणे, माहिती फलक लावणे व पर्यटकांसाठी गाईड नेमणे ही कामे या समितीने मिळालेल्या शुल्कातून करायची असताना मागील पाच वर्षात यापैकी एकही काम समितीने केलेले नाही, म्हणजे समिती केवळ भाविक व पर्यटक यांची लूट करत असल्याचे समोर आले आहे. संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या घटनेनुसार जमा रक्कमेचा निम्मा हिस्सा हा वेहेरगाव ग्रामपंचायतीला दिला जात असल्याचे समितीचे सचिव व वनरक्षक संदीप मुंडे यांनी सांगितले.
60 लाख रुपये उपद्रव शुल्क जमा
वर्षाला सरासरी 12 लाख रुपये म्हणजेच मागील पाच वर्षात येथे 60 लाख रुपये उपद्रव शुल्क जमा झाला आहे. समितीच्या उपद्रव शुल्क वसुली नाक्यावर 8 कर्मचारी काम करत असून स्वच्छतेच्या कामासाठी केवळ दोन महिला नेमण्यात आल्या आहेत. वसुली नाक्यावर जमा होणारे शुल्कापैकी निम्मी रक्कम ही वसुली नाक्यावरील कामागारांच्या पगारासाठी खर्च होत असल्याने उपद्रव शुल्क वसुली ही परिसर साफ सफाईसाठी आहे की कामगारांच्या पगारासाठी अशीदेखील चर्चा आहे. नुकतीच 7 दिवसांपुर्वी एकवीरा देवीची चैत्र यात्रा पार पडली. यात्रेकरिता राज्यभरातून लाखो भाविक वेहेरगाव गावात देवीच्या दर्शनासाठी आले होते. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण झाला होता. हा कचरा गोळा करण्याचे कामदेखील या समितीने वा ग्रामपंचायतीने यात्रा संपल्यानंतर केले नाही.
मुंबई महानगरपालिकेकडून परिसराची स्वच्छता
मुंबई महानगरपालिकेचे स्वच्छता विभागाचे कर्मचारी, ठेकेदार व अधिकारी यांच्या टिमने शनिवारी एकवीरा देवी पायथा ते गड परिसर दरम्यान स्वच्छता मोहीम राबवत मोठ्या प्रमाणात कचरा गोळा केला. समिती केवळ उपद्रव शुल्काच्या नावाखाली भाविकांची व पर्यटकांची लूट करत आहे. समितीकडून जमा झालेल्या रक्कमेचा निम्मा वाटा उचलणारी वेहेरगाव ग्रामपंचायतदेखील या निधीतून भाविकांना सुखसोयी देण्याचे कोणतेही ठोस काम करत नसल्याने या समितीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून वरिष्ठांनी याप्रकरणी लक्ष घालत संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा उपद्रव शुल्क वसुली बंद करावी अशी मागणी भाविक व पर्यटक करत आहेत.