वैकुंठधाम स्मशानभूमीचा कायापालट

0

माणसाला जन्म आहे तर मृत्यूही निसर्गाने दिला आहे. मृत्यू कुणाला चुकलेला नाही. मृत्यू कधीच गरीब-श्रीमंत भेदभाव करत नाही. मनुष्य प्राण्यावर मृत्यूनंतर काय संस्कार करावेत, हे विविध धर्मांनी विविध रीतीने नमूद केले आहे. मृत्यूनंतर प्रत्येक मनुष्याची वाटचाल स्मशानभूमीत होते. ठाण्यातील मुख्य स्मशानभूमी वैकुंठधाम हे नाव सर्वांना परिचित आहे. ठाण्यातील मुख्य स्मशानभूमी वैकुंठधामचा कायापालट लवकरच होणार असून, देशातील प्रथम क्रमांकाची व अत्याधुनिक सोयींनी युक्त अशी स्मशानभूमी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली इंद्रधनुष्य (सहीयारा) ही सेवाभावी संस्था करत आहे. ठाण्यातील वैकुंठधाम स्मशानभूमी ही पोर्तुगीज ते पेशवाईच्या काळापर्यंत आणि ब्रिटिश ते स्वातंत्र्योत्तर काळापर्यंत 8 पिढ्यांची साक्षीदार वास्तू आहे. म्हणूनच या वास्तूला ठाणेकरांच्या दृष्टीने मोठे महत्त्व आहे. 5 हजार वस्ती असलेल्या ठाण्यापासून ते 25 लाखांपर्यंत वस्ती झालेल्या ठाण्यापर्यंतची घडामोड पाहिलेल्या या वास्तूचे आता बदलत्या काळानुसार अत्याधुनिकीकरण होणार आहे. आतापर्यंत वैकुंठधामचा जीर्णोद्धार 12-13 वेळा तरी झाला असेल.

इंद्रधनुष्य (सहीयारा) या सेवाभावी संस्थेने वैकुंठभूमीच्या नवनिर्माणासाठी 5 कोटी रुपये खर्च करण्याची तयारी दाखवली आहे. सध्याच्या फायर ब्रिगेडपासून ते वखारीपर्यंतच्या विविध सहा भागांनी मिळून सुमारे 3000चौरस मीटरच्या क्षेत्रात नवीन स्मशानभूमीचा आराखडा तयार केला असून, त्याप्रमाणे ठामपा व इंद्रधनुष्य या संस्थेची तयारी सुरू आहे. जुन्या फायर ब्रिगेडची शेड, त्यापाठीमागचे जुने गोदाम, जवळचे मंदिर, अडगळीतील रस्त्यावरचे शौचालय, प्रवेशद्वाराजवळची काही निवासी बांधकामे हटवली जाणार आहेत. ठाणे शहराच्या येत्या 50 वर्षांच्या परिस्थितीचा विचार करून स्मशानभूमीचे हे बांधकाम केले जाणार आहे. 15 वर्षांपूर्वी वैकुंठधाम येथे विद्युतदाहिनी बसवण्यात आली. परंतु, अनेक नागरिकांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. नव्या स्मशानभूमीच्या बांधकामावेळी 6 मशीन लाकडासह अग्नी देण्याच्या बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे हिंदू नागरिकांसाठी योग्य सोय होईल. आजूबाजूच्या वस्तीला त्रास होऊ नये म्हणून आऊटलेट चिमणीद्वारे धूर, विस्तव, उष्णता वातावरणात सोडले जाईल. त्यामुळे पूर्वीसारखे प्रदूषण होणार नाही. मृतदेह जाळण्यासाठी वापरण्यात येणार्‍या लाकडांचे प्रमाण पूर्वीपेक्षा कमी होईल. ज्यांना विद्युतदाहिनी नको आहे त्यांना ईकोफे्रन्डली पर्याय ठेवणार्‍या अत्याधुनिक मशिनरी उपलब्ध केल्या जाणार आहेत. 300 माणसे बसू शकतील, असे सभागृह, लाकूड, गॅस, इलेक्ट्रिकल अग्नी देणार्‍या 6 मशीन्स, टॉयलेट, कार्यालय, मंदिर अशा सहा टप्प्यांत अत्याधुनिक वैकुंठधामच्या बांधकामाचा आराखडा तयार केला आहे. ठामपा आयुक्त गेली दोन वर्षे या प्रोजेक्टचा अभ्यास करत होते. इंद्रधनुष्य (सहीयारा) संस्थेचे अध्यक्ष रसिकभाई शहा यांच्या प्रयत्नाने वर्षभरातच वैकुंठधामचे अत्याधुनिकीकरण होणार आहे. ठाण्यातील नागरिकांच्या सोयीसाठी झटणार्‍या इंद्रधनुष्य या संस्थेचे याबद्दल अभिनंदन करावे तितके थोडेच आहे. इतिहासकालीन वैकुंठधाम स्मशानभूमीचे अत्याधुनिकीकरण येत्या 50 वर्षांचे ठाणे समोर ठेवून केले जात आहे. एकविसाव्या शतकात ठाण्यातील वैकुंठधाम स्मशानभूमी देशातील प्रथम क्रमांकाची अत्याधुनिक स्मशानभूमी बनत आहे. याद्वारे नागरिकांची सेवा करण्याचा प्रयत्न करणार्‍या इंद्रधनुष्य (सहीयारा) व ठामपा प्रशासनाचे ठाणेकर
नेहमीच ऋणी राहतील.

– अशोक सुतार
8600316798