वैचारिक क्रांतीसाठी ग्रंथसंपदा तरुणांपर्यंत पोहोचावी : मुक्ता टिळक

0

पुणे । अवतीभोवती भौतिक सुविधा असल्या तरी आज मानसिक शांतीचा अभाव दिसतो. अशावेळी पुस्तके आपल्या जीवनाला आधार देतात. मोबाईल, इंटरनेटच्या जमान्यात भरकटत असलेल्या तरुणाईमध्ये वैचारिक क्रांती घडायची असेल, तर युगऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या साहित्यासारखी चांगली ग्रंथसंपदा तरुण पिढीपर्यंत पोहोचावी, असे मत पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केले.

17 सप्टेंबरपर्यंत प्रदर्शन
गायत्री परिवारतर्फे सेवा शांतिकुंज हरिद्वारचे युगऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन 8 ते 17 सप्टेंबर या कालावधीत बाजीराव रस्त्यावरील आचार्य अत्रे सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी झाले. याप्रसंगी मुक्ता टिळक बोलत होत्या. ज्येष्ठ पत्रकार शाम अगरवाल, गायत्री परिवारचे कैलास महाजन, अरुण खंडागळे, प्रतिभा मुळे, रोहित श्रीवास्तव, हेमंत जोगळेकर, आशिष रहांगडाले याप्रसंगी उपस्थित होते.

साहित्य लोकांपर्यंत पोहचण्याची गरज
पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या लेखनाला विज्ञान आणि अध्यात्माचा आधार आहे. वैफल्य, मरगळ घालविण्यासाठी अशा चांगल्या साहित्याला लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. आजच्या धकाधकीच्या आणि चिंतामय असलेल्या जीवनात पंडितजींचे साहित्य उपयुक्त आहे. लोकांचे आयुष्य बदलण्यासाठी ते पूरक आहे, असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले. अंकुर मेहता यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर हेमंत जोगळेकर यांनी आभार मानले.