वैजनाथच्या घाटातून २६८ ब्रास वाळूचा अतिरीक्त उपसा

ठेकेदाराकडून घाट अखेरीस जमा ; वाळू चोरी रोखण्याचे आव्हान

जळगाव – एरंडोल तालुक्यातील वैजनाथ येथील वाळू घाटातून २६८ ब्रास वाळूचा अतिरीक्त उपसा झाल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी दिली. दरम्यान संबंधित ठेकेदाराने हा घाट जमा केल्याचे पत्र प्रशासनाला दिले असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे या घाटातून आता वाळु उचल बंद होणार आहे.
एरंडोल तालुक्यातील वैजनाथ वाळु घाटातून अतिरिक्त उपसा होत असल्याची तक्रार अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. या घाटाचा ठेका श्रीश्री इन्फ्रारस्ट्रक्चर प्रा. लि.तर्फे आदित्य श्रीराम खटोड यांनी निवीदा भरून घेतला होता. अ‍ॅड. पाटील यांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकार्‍यांनी या घाटाची मोजणी करण्याचे आदेश दिले होते. या घाटाची मोजणी झाल्यानंतर त्याचा अहवाल प्रशासनाला सादर झाला असुन वैजनाथच्या घाटातून २६८ ब्रास वाळुचा अतिरीक्त उपसा झाल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी दिली. दरम्यान संबंधित ठेकेदाराने हा ठेका जमा करीत असल्याचे पत्रही दिल्याचे त्यांनी सांगितले.
वाळू चोरी रोखण्याचे आव्हान
जिल्ह्यात टाकरखेडा वगळता इतर ठेके बंद असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी दिली. सर्व घाटांची मुदत दि. ९ जून रोजी संपणार आहे. त्यामुळे इतर घाटातून वाळू चोरी रोखण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे. दरम्यान जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सर्व तहसीलदार आणि प्रांताधिकार्‍यांची बैठक घेऊन वाळू चोरी होणार नाही यादृष्टीने उपाययोजना करण्याच्या सक्त सुचना दिल्या असल्याचे श्री. महाजन यांनी सांगितले. वाळु घाटाच्या ठिकाणी झोपडी उभारून पथके तैनात केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.