वैज्ञानिक घडविण्यासाठी शाळांनी विद्यार्थ्यांना संधी द्यावी

0

जुन्नर । भावी वैज्ञानिक घडविण्यासाठी विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांना अधिकाअधिक संधी शाळांनी उपलब्ध करून दिली पाहिजे, असे पुणे जिल्हा माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी सांगितले. जुन्नर पंचायत समिती, शिवनेरी फाउंडेशन खानापूर व जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन खानापूर येथे भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाच्या समारोप व बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते.या प्रदर्शनात 318 प्रकल्प सादर करण्यात आले असल्याची माहिती जुन्नर तालुका विज्ञान संघाचे अध्यक्ष रतिलाल बाबेल यांनी दिली. वैजापूरचे नायब तहसीलदार स्वप्नील खोल्लम, उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे, गटशिक्षणाधिकारी के. डी. भुजबळ, शुभंकर कणसे, अशोक लांडे, किसन खोडदे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी मारली बाजी
सहावी ते आठवी या गटात अनंतराव कुलकर्णी शाळेच्या अद्वैत खोकराळे याने प्रथमतर द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे सिद्धार्थ गायकवाड व ईश्‍वरी थोरात यांनी मिळविला. नववी ते बारावी या गटात कुकडी स्कूलच्या ओम धेडे, राज सोलाट व रोहित खराडे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. आदिवासी गटात कुमकर आदित्य व अजय पोटे यांनी प्रथम तर काळू दाभाडे व बोर्‍हाडे नूतन यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. तर शिक्षकांच्या वेगवेगळ्या गटात बोंबाटकार श्रीकांत, साळुंखे सुदाम, केंद्रे डी. एस, नाडेकर मोहन, घाडगे चंद्रकांत यांनी प्रथम क्रमांक पटकाविले. महाजन एस.डी., भालेकर एस.आर., वायकर बी. बी., आदलिंगे व्ही. एस. व देवरे एस. डी. यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक आर. आर. बाबेल यांनी तर आभार मुरादे राजेंद्र यांनी मानले.

बिबट्याच्या समस्या व उपायांवर मार्गदर्शन
विज्ञान प्रदर्शनानिमित्त डॉ. अजय देशमुख यांनी बिबट्याच्या समस्या व उपाय याविषयावर विस्तृत माहितीपर सादरीकरण केले. विद्यार्थी व उपस्थितांना बिबट्याच्या समस्या जुन्नर तालुक्यातच का निर्माण झाल्या आहेत व त्यावर आपण कशा प्रकारे उपाययोजना केल्या पाहिजे हे समजावून सांगितले.