खगोलशास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरूप यांची अपेक्षा : ’संवाद’ कार्यक्रमांतर्गत मुलाखत
पुणे : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासाठी शालेय स्तरावर चांगले विज्ञान शिक्षक निर्माण व्हायला हवेत. भारतीयांकडे विज्ञानाची दूरदृष्टी आहे. मात्र, अंमलबजावणीत आपण मागे पडतो. त्यासाठी शाळा-महाविद्यालयांत विज्ञान कार्यशाळा व्हायला हव्यात, अशी अपेक्षा ज्येष्ठ रेडिओ खगोलशास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरूप यांनी व्यक्त केली. ’उचित माध्यम’ प्रकाशीत ’संवाद…सर्जनशील मनाशी’ विज्ञान-तंत्रज्ञान विशेषंकाच्या प्रकाशनावेळी डॉ. गोविंद स्वरूप यांची नितीन शास्त्री यांनी मुलाखत घेतली. विद्यार्थी सहायक समितीच्या आपटे वसतिगृहातील मोडक सभागृहात रंगलेल्या या मुलाखतीवेळी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चचे (आयसर) डॉ. अरविंद नातू, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, पत्रकार जीवराज चोले, रेश्मा चोले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
विज्ञान लहान मुलांपर्यंत पोहोचवा
डॉ. होमीबाबा यांच्याबरोबर मला काम करता आले. त्यांची दूरदृष्टी अफाट होती. उटी आणि खोडद येथील जीएमआरटी महाकाय दुर्बिणीची निर्मिती करण्याचे भाग्य मला मिळाले. विज्ञान प्रसाराचे कार्य अनेकजण वेगवेगळ्या पद्धतीने करीत आहेत. विज्ञान संस्थाही ’ओपन डे’ ठेवून मुलांना विज्ञानाविषयी आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करताहेत. मात्र, शालेय वयातच विज्ञानाची गोडी विद्यार्थ्यांना लागायची असेल, तर आपल्याला चांगले आणि प्रयोगशील विज्ञान शिक्षक घडवायला हवेत. विज्ञान लहान मुलांपर्यत पोहोचणे गरजेचे आहे, त्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न झाले पाहिजेत. विज्ञानाची ओळख लहान वयात झाली तरच भविष्यात शास्त्रज्ञ निर्माण करू शकतो, असे डॉ. गोविंद स्वरूप यांनी पुढे सांगितले.
स्पर्धेमध्ये राहणे गरजेचे
विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे मानवाचे जीवन अधिक सुखकर झाले आहे आणि प्रगतीही वेगाने होत आहे. आधुनिक तंत्रज्ञान हा माणसाच्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग झाला आहे. तंत्रज्ञानाचे प्रवाह कायम बदलत असून त्यानुसार माणसाला बदलणे गरजेचे आहे कारण त्याला स्पर्धेमध्ये राहणे गरजेचे आहे. यंत्रमानवामुळे माणसाचे जगणे अधिक सोपे होणार असले तरी त्याच्यासोबतच माणसाचे भविष्यामध्ये मोठे संघर्ष होणार असल्याचे डॉ. दीपक शिकारपूर यांनी सांगितले. डॉ. रवींद्रकुमार सोमण व डॉ. कमालकांत वडेलकर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जीवराज चोले यांनी केले. तर सूत्रसंचालन लक्ष्मण जाधव यांनी केले.