‘वैदिक ज्ञाना’चा सेतू बांधा रे!

0

‘सेतूसमुद्रम् प्रकल्पाद्वारे रामसेतूला धक्का पोहोचवू पाहणार्‍या, श्रीराम हे काल्पनिक पात्र असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणार्‍या काँग्रेसकडून संस्कृतीपूरक पावले उचलली जातील, अशी अपेक्षा नव्हतीच ! पण ‘रामाच्या नावाने मते मागणार्‍या आणि सत्तेत आलेल्या भाजपने सत्ताप्राप्तीनंतर संस्कृतीच्या पाऊलखुणा जपण्यासाठी प्रयत्न करावेत’, अशी जनभावना होती. मात्र, संस्कृतीप्रेमी म्हणवणार्‍या भाजपने ना गुरुकुल शिक्षणपद्धतीसंदर्भात कृतिशील भूमिका घेतली ना अयोध्येत रामजन्मभूमीवर राममंदिर बांधण्यासंदर्भात!

हिंदूंच्या धार्मिक श्रद्धा या आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवरही सत्य असल्याचे सांगणारे एक महत्त्वपूर्ण संशोधन जगाच्या समोर आले आहे. हिंदूंच्या धर्मश्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा आहेत, असे मानणार्‍या आणि तसा प्रसार करणार्‍या विदेशी हस्तकांचा एक गट भारतात कार्यरत आहेत. स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणार्‍या या व्यक्ती विज्ञानवादाच्या नावाखाली वेदविज्ञानाची हेटाळणी करण्याचा आणि हिंदूंची सनातन धर्माशी जुळलेली नाळ तोडण्याचा प्रयत्न करत असतात. वैदिक विज्ञानाची तथ्ये जेव्हा आधुनिक विज्ञानाद्वारेही सिद्ध होतात, तेव्हा या मात्र कथित विज्ञानवाद्यांचे (सनातन धर्माची उपेक्षा करणार्‍यांचे) पितळ उघडे पडते.

रामसेतूचे सत्य
अमेरिकी शास्त्रज्ञांच्या नुकत्याच समोर आलेल्या एका संशोधनाच्या निष्कर्षानंतरही हिंदूद्वेष्ट्यांचा बुरखा पुन्हा एकदा फाटला आहे. कारण अमेरिकी भूवैज्ञानिकांनी रामसेतूविषयक केलेल्या संशोधनाअंती ‘रामसेतू नैसर्गिक नाही, तर मानवनिर्मित आहे’, असा दावा केला आहे. या संशोधनामुळे ‘वानरसेनेने प्रभू श्रीरामचंद्रांचे स्मरण करून दगड पाण्यात टाकले आणि पूल बनवला’, या रामायणातील उल्लेखाला पुष्टी मिळाली, तर ‘प्रभू श्रीरामाला काल्पनिक पात्र आणि रामायणाला कविकल्पना’ संबोधणार्‍यांना सणसणीत चपराक बसली.

धार्मिकतेला वैज्ञानिकतेचीही जोड
केवळ रामसेतूच नाही, तर रामायण तसेच महाभारत या धर्मग्रंथांमध्ये ज्यांचे संदर्भ येतात. दुर्दैवाने या संशोधनासाठी प्रोत्साहन नसल्याने वैदिक ज्ञानाच्या खजिन्यापासून आपण आजही वंचित आहोत. ‘राम-रावण युद्धात जेव्हा लक्ष्मण मूर्च्छित झाला तेव्हा त्याच्यावर उपचार करण्यासाठी संजीवनी वनस्पतीची आवश्यकता होती. हनुमानजी संजीवनी शोधण्यासाठी गेले. मात्र, ती ओळखता न आल्याने त्यांनी संजीवनी वनस्पती असलेल्या पर्वताचा तुकडाच उचलून आणला’, अशी रामायणात कथा आहे. हनुमानाने आणलेला तो पर्वताचा तुकडा आजही श्रीलंकेत असून, रुमासल्ला पर्वत या नावाने प्रसिद्ध आहे. या पर्वतावर आढळणार्‍या वनस्पतींमध्ये औषधी गुणधर्म असून, श्रीलंकेत इतरत्र आढळणार्‍या वनस्पतींपेक्षा या पर्वतावरील वनस्पती पूर्ण वेगळ्या आहेत. त्यावर संशोधन झाले, तर कित्येक तथ्ये बाहेर येतील. वेद, उपनिषद, पुराणे, रामायण, महाभारत आदी धर्मग्रंथ हे केवळ पारलौकिक उपदेशासाठी नाहीत, तर समाजव्यवस्था, राजव्यवस्था, न्यायव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, संरक्षणव्यवस्था, अर्थव्यवस्था, कृषीव्यवस्था अशा कित्येक व्यवस्थांच्या आदर्श व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन करणारे, विज्ञान, संगीत, नृत्य, तत्त्वज्ञान यांविषयी ज्ञानाचा खजिना असणारे आहेत. आवश्यकता आहे ती, त्याकडे ज्ञानार्जनाच्या भावाने पाहण्याची!

वेदविज्ञानाचे श्रेष्ठत्व
जंतूंचा नाश करणारे गंगाजल, कित्येक शतकेही लोटूनही न गंजलेला दिल्ली येथील लोखंडी विजयस्तंभ (इंद्रस्तंभ), स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असलेली देवालये, सौंदर्याची आणि कलात्मकतेची अनुभूती देणारी लेणी, किरणोत्सर्गापासून संरक्षण करणारा अग्निहोत्र विधी, पाऊस पाडण्याचेही सामर्थ्य असलेले शास्त्रीय संगीत अशी कित्येक उदाहरणांमधून वैदिक विज्ञानाच्या प्रागतिकतेची साक्ष पटते. वैदिक विज्ञान हे समाजाला अंतिम ध्येयाच्या दिशेने म्हणजे मोक्षप्राप्तीच्या दिशेने घेऊन जाणारे आहे.

गुरुकुल शिक्षणपद्धती हाच उपाय
‘हिंदुत्व म्हणजे हीनत्व’, अशी देशाच्या प्रमुखाची भावना असल्याने हिंदुत्वावर आघात करण्याचे इंग्रजांनी जे प्रयत्न केले होते, ते स्वातंत्र्योत्तर काळातही तसेच चालू ठेवले गेले. उलट त्यामध्ये वाढच करण्यात आली. गुरुकुल शिक्षणपद्धत मोडीत काढून कारकुनी शिक्षणपद्धत तशीच चालू ठेवणे, ही त्यांतील एक महत्त्वाची घोडचूक होती. मात्र, ती दुरुस्त करण्याचे अद्यापपर्यंत कुणी धारिष्ट्य दाखवले नाही. ‘सेतूसमुद्रम् प्रकल्पाद्वारे रामसेतूला धक्का पोहोचवू पाहणार्‍या, श्रीराम हे काल्पनिक पात्र असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणार्‍या काँग्रेसकडून संस्कृतीपूरक पावले उचलली जातील, अशी अपेक्षा नव्हतीच! पण ‘रामाच्या नावाने मते मागणार्‍या आणि सत्तेत आलेल्या भाजपने सत्ताप्राप्तीनंतर संस्कृतीच्या पाऊलखुणा जपण्यासाठी प्रयत्न करावेत’, अशी जनभावना होती. मात्र, संस्कृतीप्रेमी म्हणवणार्‍या भाजपने ना गुरुकुल शिक्षणपद्धतीसंदर्भात कृतिशील भूमिका घेतली ना अयोध्येत रामजन्मभूमीवर राममंदिर बांधण्यासंदर्भात! किमान आतातरी सरकारने धर्म आणि संस्कृती हितकारक निर्णय घ्यावेत, वैदिक ज्ञानाच्या संशोधनासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे, त्यासाठी संस्कृतचे ज्ञान आवश्यक असल्याने संस्कृतला राष्ट्रभाषा घोषित करून संस्कृतचा प्रसार करावा, विद्यार्थ्यांना परकीय नाही, तर भारताच्या गौरवशाली ज्ञानाचे शिक्षण द्यावे! असे झाले, तर भारत पुन्हा एकदा विश्‍वगुरूपदी विराजमान होण्यास वेळ लागणार नाही.

– चेतन राजहंस,
प्रवक्ता, सनातन संस्था
7775858387