पुणे । भारतातील वैदिक ब्राह्मण समाजाला अल्पसंख्यांक धर्माचा दर्जा मिळावा, अशी मागणी विश्व ब्राह्मण संघटना तसेच पूर्वोत्तर बहूभाषिक ब्राह्मण महासभेने राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाकडे केली आहे. या मागणीला आदिम हिंदू परिषदेचा पाठिंबा असून आयोगाने ही मागणी नाकारण्याचे कोणतेही संयुक्त कारण नाही, असे अध्यक्ष संजय सोनवणी यांनी सांगितले आहे.
वैदिक धर्म हा सुरुवातीपासून ते आजतागायत स्वतंत्र धर्म असून त्या धर्मातील धर्मग्रंथांच्या पठणाचे ते वेदोक्त कर्मकांडांचे अधिकार फक्त वैदिक लोकांना असतात. हिंदुंना ते अधिकारच नसल्याने वैदिक धर्म हा हिंदू धर्माचा भाग होऊ शकत नाही. वैदिक धर्मियांचे धर्मजीवन पूर्णता स्वतंत्र आहे. त्यामुळे वैदिक हे हिंदू धर्माचे अविभाज्य भाग असल्याचे आयोगाचे निरीक्षण चुकीचे आहे, असेही सोनवणी म्हणाले.
हिंदू धर्मात फूट पडण्याचा दावा हास्यास्पद
राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाकडे दोन संघटनांची मागणी केंद्रानेच शिफारशींसाठी पाठवली होती. भारतातील अल्पसंख्यांक धर्मात आधीच बौद्ध, जैन, शिखादि धर्म सामील आहेत. अल्पसंख्यांक धर्माचा दर्जा दिल्यावर त्यांना विशेष सवलती देण्यात येतात. वैदिक धर्मालाही हा दर्जा दिला तर हिंदू धर्मात फूट पडेल हा आयोगाचा दावा हास्यास्पद असल्याचे सोनवणी यांनी सांगितले. आपण हिंदू आहोत हेच मुळात वैदिक धर्मियांना मान्य नसताना व वैदिक-वैदिकेतर वाद हा भारतात गेली हजार वर्ष जीवंत असताना दोघांनाही एकधर्मीय समजणे ही आयोगाची चूक आहे, असे पुढे सांगितले.
धर्म वेगळे असल्याचे पुरावे
या संदर्भात आपण अल्पसंख्यंक आयोगाला सविस्तर पत्र लिहिणार असून त्यात विश्व ब्राह्मण संघटना तसेच पूर्वोत्तर बहूभाषिक ब्राह्मण महासभेच्या मागणीला पाठिंबा देत हे दोन धर्म कसे मुलत: वेगळे आहेत याचे पुरावे सादर करणार आहोत, असेही संजय सोनवणी यांनी सांगितले.