कारवाई करण्याची वृक्षप्रेमींची मागणी ; वानवडी विभाग उद्यानविभागाला पत्र
हडपसर : वैदूवाडी गणपतीच्या मंदिराजवळ विनापरवाना झाडांची कत्तल करण्यात आली असल्याने वृक्षप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे, झाडांची कत्तल करणार्यांविरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी वृक्षप्रेमी तुकाराम शिंदे यांनी केली आहे. यासंदर्भात हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांच्याकडे शिंदे यांनी लेखी निवेदन दिले आहे.
वैदूवाडी येथे सुमारे चार वर्षांपूर्वी झाडे लावली होती, ही झाडे चांगलीच मोठी होऊन सावली देत होती. या झाडांचा ज्येष्ठ नागरिकांना आधार होता. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार झाडे तोडण्यापूर्वी महापालिकेची रितसर परवानगीघ्यावी लागते, मात्र काही समाजकंटकांनी विनापरवाना महापालिकेला कोणतीही सूचना न देता या मंदिराशेजारील झाडांची रातोरात कत्तल केली आहे.
यासंदर्भात शिंदे यांनी वानवडी विभाग उद्यान विभाग व पोलीस स्टेशनला पत्र देऊन कारवाई करण्याची लेखी मागणी केली आहे. झाडे तोडण्यापूर्वी महापाकिकेची रीतसर परवानगी घेण्यासाठी नियमावली करण्यात आली आहे मात्र परवानगी न घेता झाडे तोडण्याचा गुन्हा केला जातो, पालिकेच्या उद्यान विभागाचे अधिकारी याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात, आर्थिक देवाणघेवाण करून विनापरवानगी झाडे तोडली जातात, हडपसर परिसरात अनेक सोसायट्या व व्यावसायिकांनी झाडे तोडलेली निदर्शनास आली आहेत मात्र अधिकारी लक्ष देत नसल्याने वृक्षप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
फौजदारी गुन्हा दाखल?
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्वराज्य संस्था, संबंधित अधिकार्यांची परवानगी न घेता वृक्षतोड केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा अधिकार उद्यानविभागास आहे. नागरिकांनी संगनमताने झाडे तोडल्यास अधिकार्यांवरही कारवाई होऊ शकते.