वैदू समाजातील मुलीला दहावीच्या परीक्षेत 90 टक्के

0

स्वातंत्र्याच्या 71वर्षानंतरही शिक्षण नसलेल्या आणि पारंपरिक प्रथांत अडकेला समाज
समाजातील सर्व स्तरातून संजना आंब्रे हिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

पिंपरी-चिंचवड : पारंपरिक प्रथांच्या गराड्यात अडकलेल्या वैदू समाजात स्वातंत्र्याच्या कित्येक वर्षानंतर देखील शिक्षणाची गंगा पोहोचलीच नाही. त्यामुळे शिक्षणापासून वंचित असलेला समाज आणखीनच रूढीवादी होत गेला. त्यात मुलींनी शिकायचे म्हटल्यावर तर समाजातून नकारात्मक सूर नक्कीच येतो. अशा परिस्थितीत संजना गणेश आंब्रे या विद्यार्थिनीने इयत्ता दहावीच्या परीक्षेत तब्बल 90 टक्के गुण मिळविले आहेत. वैदू समाजात 90 टक्के मिळविलेली ती पहिली मुलगी ठरली आहे. तिच्या या यशामुळे समाजाच्या विविध स्तरातून संजनावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

घरोरी भिक्षा मागणारा समाज
संजनाचे वडील गणेश आंब्रे आकुर्डी येथील आयकर विभागात चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. आपल्या मुलीने शिकावे, शिकून नाव कमवावे, जे आजवर वैदू समाजातील मुलींना जमले नाही एवढे यश मिळवावे, अशी गणेश यांची इच्छा आहे. वैदू समाजात सध्या जर शिक्षण घेतले नाही, तर दगड फोडणे, घरोघरी जाऊन भिक्षा मागणे अशी कामे करावी लागतात. अशी वेळ आपल्या मुलांवर येऊ नये यासाठी गणेश यांनी संजनाला शिकविण्याचा ध्यास त्यांनी घेतला.

बनायचे आहे पोलीस अधिकारी
संजना दररोज शाळेतून आल्यानंतर लिखाण आणि पहाटे दोन वाजता उठून वाचन करायची. असा नित्यक्रम तिने संपूर्ण वर्षभर कायम ठेवला. अभ्यासामध्ये असलेल्या सातत्यामुळे तिच्या संपूर्ण अभ्यासक्रमाची सुमारे 15 आवर्तने झाली. त्यामुळे तिला उत्तुंग यश मिळाले आहे. संजनाला पुढे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन पोलीस अधिकारी व्हायचं आहे. तिला संस्कृत विषय आवडत असून संस्कृतमध्ये तिला 94 गुण मिळाले आहेत. तिच्या या यशाबद्दल आकुर्डी परिसरात आणि वैदू समाजात मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.