वरणगाव। गेल्या अनेक दिवसांपासून वरणगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसल्याने रूग्णांची हेळसांड होत आहे. उपचाराअभावी मयत झाल्याच्या घटनासमोर आल्या आहेत. मात्र कुंभकरणी झोप घेणार्या शासनाला जाग येत नसल्याने सत्ताधार्यांना वैद्यकीय अधिकारी नियुक्तीसाठी संघर्ष करावा लागत आहे. वरणगाव शहराच्या एका बाजुला सत्ताधारी पक्षाचे आमदार एकनाथराव खडसे तर दुसर्या बाजूला जलसंपदामंत्री गिरीष महाजन व मध्यवर्ती सत्ताधारी पक्षाचे आमदार सावकारे असतांनादेखील वरणगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकरी यांची कायमस्वरुपी नियुक्ती होत नाही. यामुळे सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक त्रस्त झाले आहे.
लेखी आश्वासनानंतर निवळला तणाव
एका बाजुला नागरिकांचे बोलणे दुसर्या बाजूला निर्ढावलेले शासन यामुळे आरोग्य सेवेवर परिणाम झाला असून येथील ग्रामीण रुग्णालय हे केवळ शोभेची वास्तू ठरत आहे. मंगळवारी झालेल्या अपघातात वैद्यकीय अधिकारी नसल्याने महिलेचा मृत्यू झाला होता. तर 21 रोजी मुक्ताईनगर येथे जळगाव जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर एस.पी. भामरे यांना रुग्णालयात नगरसेवकांनी बोलवून याबाबत विचारणा केली. मात्र समर्पक उत्तरे न मिळाल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता. मात्र तात्पुरत्या स्वरुपाचे नियुक्ती केलेले डॉक्टर मयूर वाघ यांना आठ दिवसांची नियुक्ती देवून कायमस्वरूपी अधिकारी देण्याचे लेखी आश्वासन दिल्याने तणाव निवळला.
निवेदनास केराची टोपली
यावेळी भाजपाचे गटनेते सुनील काळे, सुधाकर जावळे, नगराध्यक्षा अरुणा इंगळे, आरोग्य सभापती माला मेढे, नगरसेविका वैशाली देशमुख, बबलू माळी, राजेंद्र चौधरी, रविंद्र सोनवणे, दिपक मराठे, महेश सोनवणे, संतोष माळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. सत्ताधार्यांची शहरापासून ते दिल्लीपर्यंत सत्ता आहे. मात्र वैद्यकीय अधिकारी नियुक्तीसाठी संघर्ष करावा लागत आहे. सत्ताधार्यांनी केलेल्या आंदोलन अथवा निवेदन दिले असतील या सर्वांना वरिष्ठांनी केराची टोपली दाखविली. यामुळे आता तरी वरिष्ठ आंदोलन अथवा निवेदनाचा रस्ता सोडून वरिष्ठ पातळीवरील पदाधिकार्यांकडून नियुक्ती करून घेणे गरजेचे आहे.
अधिकार्यांनी राजीनामे द्यावे
यावेळी नियुक्तीबाबत जाब विचारला असता जिल्हा शल्यचिकित्सक यांनी सांगीतले की, माझ्या हातात नियुक्तीबाबत अधिकार नाही. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंकज पाटील यांनी खुर्ची सोडा व राजीनामे द्या, अशी मागणी केली व असलेल्या प्रकारचे वक्तव्ये अशोभनिय असल्याचे म्हटले तर विरोधी पक्षाचे गटनेते राजेंद्र चौधरी यांनी कार्यालयाला कुलूप ठोकण्याची तयारी केली होती.
शहरातील विविध मुद्यावरुन शहरात चारही पक्ष चार टोकाला असले तरी रुग्णांच्या होणार्या हालअपेष्ठे करीता भाजपा, राष्ट्रवादी व काँग्रेस या पक्षाच्या पदाधिकरी व कार्यकर्त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना धारेवर धरत एक जुटीचे दर्शन घडले. शहराच्या विकासाठी एकत्र येणे गरजेचे आहे.