शहादा । नगरपालिका ग्रामीण रुग्णालयात पुन्हा कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून परिस्थिती जैसे थे आहे. अधुन मधुन काही वेळा वैद्यकीय अधिकार्याची नियुक्ती होते.पण एक ते दीड वर्षात त्यांची अन्य ठिकाणी बदली होते.नगरपालिकेच्या रुग्णालयात ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र तो केवळ नावाला आहे.शासनाच्या लालफितीत अडकला आहे.जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पडला आहे.75 टक्के काम झाले आहे. सध्या येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. बी. पाटील यांच्याकडे तात्पुरता पदभार आहे.एवढयावरच न थांबता डॉ.पाटील यांच्याकडे शहादा नगरपालिका रुग्णालय,म्हसावद ग्रामीण रुग्णालय,तोरणमाळ प्राथमिक आरोग्य केंद्राचा अतिरिक्त भार आहे.पर्यायाने शहरातील सर्व सामान्य नागरिकांना चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा मिळत नाही.शहादा शहराची 60 हजारापर्यंत लोकसंख्या बघता आहे तो नगरपालिकेचा दवाखाना सोयीसुविधा व इमारत बघता नागरीकांना चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा मिळत नाही.कर्मचारी वर्ग आहे त्या सुविधामधुन रुग्नाना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतात.पण शेवटी मर्यादा येते.
ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न सोडवावा
जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव पडुन आहे. पालकमंत्री जयकुमार रावल यानी दखल घेऊन शहादा नगरपालिका ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी आहे. रुग्णालयात वैद्यकीय अधिकार्याना वेतन देण्याचा प्रश्न निर्माण होतो. नगरपालिका एवढ्या मोठ्या प्रमाणात वेतन देऊ शकत नाही. म्हणून वैद्यकीय अधिकार्याचा प्रश्न निर्माण होतो अशी माहिती अधिकार्यांनी दिली.
वेगवेगळे साथीचे रोग फैलवतात
म्हसावद व तोरणमाळ परिसर आदिवासी भाग आहे व दुर्गम भाग असल्याने वेगवेगळ्या साथीचे रोग फैलवतात.विविध घटना घडत असतात.सिकलसेल सारखा जीवघेणा आजार वाढत आहेत, त्यामुळे डॉ पाटील याना तोरणमाळ भागात जास्त वेळ द्यावा लागतो. त्यानंतर म्हसावद ग्रामीण रुग्णालयात वेळ द्यावा लागतो.त्यानंतर शहादा नगरपालिका रुग्णालयात सेवा द्यावी लागते. वेळोवेळी शहादा शहराची लोकसंख्या बघता रोज घटना घडत असतात. बर्याच वेळा प्रेतांचे शवविच्छेदन वेळेवर होत नाही. प्रेतांची हेळसांड होते अश्या अनेक घटना घडल्या आहेत. वैद्यकीय अधिकार्याचा दोष नसताना नागरीकाचा रोष ओढुन घ्यावा लागतो.हा सारा प्रकार बघता शहादा नगरपालिका रुग्णालयात तातडीने कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी देणे गरजेचे आहे. एका बाजुला शासन आरोग्यसेवेवर कोट्यावधी रुपये खर्च करत असतांना दुसर्या बाजुला आरोग्यसेवा खिळखिळी झाली आहे.म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हाधिकारी व स्थानिक आमदार व मंत्र्यांनी हा प्रश्न सोडवावा अशी मागणी आहे.
नगराध्यक्ष नगरसेवक यांचा पाठपुरावा
25 ते 30 वर्षापासून आजी माजी नगराध्यक्ष नगरसेवक यांनी पाठपुरावा केला.मंत्रालयात फेर्यामारुन नगरपालिका रुग्णालयाला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळविला. शहरातील नागरीकाना चांगली सुविधा मिळेल असे वाटत होते पण ग्रामीण रुग्णालय मृगजळ ठरले. जिल्हापरिषदेने नगरपालिका रुग्णालयाचे कर्मचारी पूर्णपणे प्रशिक्षीत नसल्याने त्याना वर्ग करण्यात विरोध केला होता.नगरपालिकेने हा प्रश्न लावुन धरल्याने कर्मचार्याचा समावेश केला.काही साहित्य व औषधीसाठा पाठविला,रुग्ण वाहिका दिल्या,किरकोळ स्वरुपाचे कर्मचारीनियुक्त केले पण इमारतीचा प्रश्न गंभीर आहे. आज ज्या इमारतीत रुग्णालय आहे ते अपूर्ण आहे. त्यात ऑपरेशन थियेटरात क्ष-किरण केंद्र नाही.