वैद्यकीय अधिकार्‍याची नियुक्ती करा

0

यावल। येथील ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरुपी वैद्यकिय अधिकारी नसल्यामुळे शहरासह परिसरातील गरजू रुग्णांचे हाल होत आहेत. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे रुग्णांच्या प्रकृतीस धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे त्वरीत वैद्यकिय अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबत बुधवार 5 रोजी तहसिलदारांना निवेदन देण्यात आले असून वैद्यकिय अधिकार्‍याची नियुक्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहेे. गरीब व आदीवासी रुग्णांची आर्थिक परिस्थितीमुळे खाजगी डॉक्टरांकडे किंवा शहरातील दवाखान्यात उपचार घेणे परवडणारे नाही. त्यामुळे गोरगरीब रुग्ण हे ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असतात मात्र याठिकाणी वैद्यकिय अधिकारी नसल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे. तसेच घात – अपघातत व इतर कारणांमुळे मृत्यू झाल्यास शवविच्छेदन होण्यास अडचणी निर्माण होवून मृत व्यक्तीच्या प्रेताची विटंबना होत आहे. शवविच्छेदनासाठी मृत व्यक्तीस इतर ठिकाणी न्यावे लागते.

शवविच्छेदनासाठी प्रेताची हेळसांड
यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकिय अधिकार्‍यांअभावी अपघाती निधनामध्ये प्रेताचे शवविच्छेदन करता येत नसल्यामुळे प्रेताची हेळसांड होते. व वेळ- पैसा खर्चा होतो. यावल येथील रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा असून कायमस्वरुपी डॉक्टर नाही त्यामुळे हे रुग्णालय असून नसल्यासारखे आहे. उपचाराअभावी रुग्ण दगावल्यास किंवा गंभीर आजारी असल्यास जबाबदार कोण? असा जाब शिवसेनेतर्फे विचारण्यात आला आहे.

पाठपुरावा करणार
येथील रुग्णालयात त्वरीत कायमस्वरुपी वैद्यकिय अधिकारी मिळावा व रुग्णांची व मृत व्यक्तींची होणारी हेळसांड त्वरीत थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेतर्फे तहसिलदारांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. याप्रसंगी कडू पाटील, जगदीश कवडीवाले, संतोष धोबी, मुन्ना पाटील, शरद कोळी, दिपक बेहेडे, योगेश चौधरी, अनिल पाटील, गोपाळ चौधरी, पप्पू जोशी, मोहसीन खान, जंगले गुरुजी, आर.के. चौधरी, गोटू सोनवणे, किरण बारी, रवि सोनवणे, सुधाकर धनगर, सुनिल बारी आदी उपस्थित होते. पदाधिकार्‍यांनी याबाबत तहसिलदारांशी चर्चा केली. याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन तहसिलदारांनी दिले आहे.

गरजूंना आर्थिक भुर्दंड
शहरासह परिसरातील ग्रामीण भागातील गोरगरीब नागरिक हे खाजगी रुग्णालयात डॉक्टरांची अव्वाच्या सव्वा फि भरु शकत नसल्यामुळे ते ग्रामीण रुग्णालयास प्राधान्य देत असतात. गरीबांना ग्रामीण रुग्णालयाचाच एकमेव आधार आहे. मात्र याठिकाणी वैद्यकिय अधिकारी नसल्यामुळे गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित राहावे लागत आहे. तर गंभीर अवस्थेत त्यांना नाईलाजास्तव खाजगी रुग्णालयातच धाव घ्यावी लागते. यामुळे सर्वसामान्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त
केला जात आहे.