जळगाव । वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीबीएसईतर्फे रविवारी शहरातील आठ केंद्रांवर ‘नीट’ परीक्षा झाली. यावेळी परीक्षा केंद्रात प्रवेश करताना प्रत्येक विद्यार्थ्यांची मेटल डिटेक्टरने तपासणी, कानातील रिंग काढल्यानंतरच विद्याथीर्नीला परीक्षा केंद्रात प्रवेश यासह प्रत्यक्ष वर्गात स्वाक्षरी, बोटाचे ठसे घेण्याची लांबलचक प्रक्रिया घेण्यात आली. या प्रक्रियेने आधीच विद्यार्थी वैतागले असतानाच परीक्षेत भौतिकशास्त्र विषयाच्या विचारलेल्या प्रश्नांनी विद्यार्थ्यांना चांगलाच घाम फोडला. मात्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र विषयाचे प्रश्न सोपे असल्याचे विद्यार्थ्यांकडून कळाले. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ‘नीट’ ही परीक्षा घेण्यात येत असते. त्यामुळे रविवारी शहरातील 8 केंद्रांवर ही घेण्यात आली. 4 हजार 388 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 75 विद्यार्थी गैरहजर होते. परीक्षेसाठी सकाळी 7 वाजेपासून परीक्षा केंद्रावर दाखल झाले होते. प्रत्येकाची मेटल डिटेक्टरने तपासणी केली गेली. या तपासणीनंतर प्रत्यक्ष वर्गात राबविण्यात आलेली प्रक्रिया व्यत्य आणणारी ठरली. परीक्षा केंद्रात प्रवेशानंतर विद्यार्थ्यांनी तपासणी करून त्यांच्या जवळील ओळखपत्र व पासपोर्ट फोटो तपासून स्वाक्षरी व बोटाचे चार वेळेस ठसे घेण्यात आले़
भौतिकशास्त्रच्या प्रश्नांनी फोडला घाम
सुचनांची भरमार आणि त्यानुसार झालेली प्रक्रिया विद्यार्थ्यांची परीक्षा पाहणारी ठरली़ विद्यार्थ्यांना सकाळी परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला़ यावेळी विद्याथी- विद्यार्थीनींच्या लांबलचक रांग लागलेली होती़ नंतर साडेनऊ वाजता वर्गात प्रवेश देण्यात आला़ 10 वाजता पेरपरला सुरूवात झाली़ त्यानंतर स्वाक्षरी, ठसे प्रक्रिया पार पडल्यानंतर 720 गुणांची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हातात मिळाली़ प्रश्न पत्रिका पाहताच सुरूवातीलाच भौतिकशास्त्रच्या प्रश्नांनी विद्यार्थ्यांचा घाम फोडला़ रसायनशास्त्र व जीवशास्त्रचे प्रश्न सोपे असल्याने ते भरभर सोडविल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले़
परीक्षेला येताना ओळखपत्र व पासपोर्ट फोटो या व्यतिरिक्त इतर कोणत्याही वस्तु सोबत आणण्यास मनाई करण्यात आली होती़ त्यामुळे परीक्षा केंद्रात प्रवेश करताच तपासणीनंतर विद्यार्थ्यांच्या बॅगा तसेच कमर पट्टा, बुट-मोजे, हातातील कडे तसेच मुलींच्या पर्स, कानातील रिंग हे बाहेर केंद्राच्या गेटवरच ठेवावे लागले़ कसून तपासणी करण्यात येत असताना हातातील धागेदोरे सुध्दा काढून घेण्यात येत होते़ तर गेटजवळ ठेवलेल्या वस्तुंची जबाबदारी मात्र, रामभरोसे होती़ परीक्षा केंद्रात पेन आणण्यास देखील मनाई असल्यामुळे केंद्रातर्फेच विद्यार्थ्यांना ते पुरविण्यात आले़ तर पाण्याच्या पिण्याची सुविधाही करण्या आली होती़ तर सुचनेप्रमाणे साध्या वेशात विद्यार्थी- विद्यार्थीनी परीक्षा देण्यासाठी आले होते.