जळगाव – काही दिवसांपूर्वी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोल्हापुरातील डॉ. मिनाक्षी गजभिये यांची बदली झाली होती. त्याबाबत अधिकृत आदेशही झाले होते. मात्र त्या हजर न होऊ शकल्याने अधिष्ठातापदाचा पदभार डॉ. भास्कर खैरे यांच्याकडेच राहणार असुन दोन दिवसांच्या सुट्टीनंतर डॉक्टर खैरे यांनी हा पदभार पुन्हा स्विकारला आहे.
जिल्ह्यात वाढलेला कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत असून रुग्णांवर तात्काळ उपचारासाठी नियमित अधिष्ठाता मिळावा, याजिल्हाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार अखेर अधिष्ठाता डॉ़ भास्कर खैरे यांना पदावरून हटविण्यात आले आहे़ त्यांच्या जागी कोल्हापूर शासकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ़ मिनाक्षी गजभिये यांची नियुक्ती करण्यात आली होती. शुक्रवारी वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ़ तात्याराव लहाने यांनी याबाबत आदेश काढले व तातडीने नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेशही देण्यात आले होते. तर दुसरीकडे डॉ. खैरे यांच्या बदलीचे कुठलेहि अधिकृत आदेश नव्हते. डॉ. गजभिये हजर होत नसल्याने संभ्रम वाढला होता.
डॉ. गजभिये हजर झाल्याच नाहीत
तातडीचे आदेश असतानाही डॉक्टर मीनाक्षी गजभिये हजर न झाल्याने हा पदभार पुन्हा अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे यांच्याकडेच राहणार आहे. दोन दिवसांपासून डॉ. खैरे हे रजेवर असल्याने त्यांचा तात्पुरता पदभार डॉ. मारुती पोटे यांच्याकडे होता. सुटीवरून परतल्यावर डॉ. खैरे यांनी पुन्हा त्यांचा अधिष्ठाता पदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे सध्यातरी अधिष्ठाता यांच्या बदलीचा घोळ मिटला असुन चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
डॉ. मिनाक्षी गजभिये या का हजर झाल्या नाही त्याबाबत माहिती नाही. अधिष्ठाता पदाचा पदभार हा माझ्याकडेच होता. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर मी तो पदभार पुन्हा स्वीकारला आहे.
-डॉ. भास्कर खैरे