पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या यशवंतराव स्मृती रुग्णालयात (वायसीएम) वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात यावे, यासाठी आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे. या विषयासंदर्भात आमदार लांडगे यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची मुंबईत भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत आमदार लक्ष्मण जगताप उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून चालविण्यात येणार्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात नवीन वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था सुरू करण्यात येणार आहे. याबाबत ‘ना हरकत प्रमाणपत्र’ आणि त्यासाठी लागणार्या शुल्कात सवलत मिळावी, यासाठी राज्य शासनाकडे रुग्णालय प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू होता. मात्र, याबाबत राज्य सरकारकडून अद्याप सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. परिणामी, वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाची गती मंदावली आहे.
शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी
वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी मिळविण्यासाठी राज्य शासनाच्या ना हरकत प्रमाणपत्राची गरज आहे. त्यासाठी लागणारे शुल्क भरण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन तयार आहे, अशा आशयाचे पत्र महापालिका वैद्यकीय विभागातील मुख्य अधीक्षकांनी राज्य शासनाकडे पाठवले आहे. त्यामुळे राज्य शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन तत्काळ ना हरकत प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे लावून धरली आहे.
ना-हरकत प्रमाणपत्राअभावी अडले घोडे!
पिंपरी-चिंचवड महापालिका वैद्यकीय विभागाच्या वतीने संत तुकारामनगर येथे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय 25 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून येथील अनेक पदे रिक्त आहेत. त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी वायसीएममध्ये पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परवानगीने या पदव्युत्तर महाविद्यालयात पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांना धडे मिळणार आहेत. मात्र, राज्य शासनाच्या ना हरकत प्रमाणपत्राअभावी केंद्र सरकारची मान्यता लांबणीवर पडली आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून, लवकरच रुग्णालयाला ना हरकत प्रमाणपत्र मिळणार असल्याचे आमदार लांडगे यांनी सांगितले.