वैद्यकीय महाविद्यालयासाठी सल्लागार संस्थेची नेमणूक

0

नियोजन ठरविण्यासाठी बैठकीचे आयोजन

पुणे : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावे प्रस्तावित असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी अखेर महापालिकेकडून पावले उचलण्यात आली आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रशासनाने या महाविद्यालयासाठी निश्चित केलेल्या सल्लागाराला वर्क ऑर्डर दिली. त्यानंतरची पहिली बैठक नुकतीच आरोग्य विभागात पार पडली. या बैठकीत पुढील कामाचे प्राथमिक नियोजन ठरविण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली. या महाविद्यालयासाठी आयएनआय डिझाईन प्रायव्हेट लिमिटेड या सल्लागार संस्थेची अखेर नेमणूक करण्यात आली आहे. महापालिकेच्या 2018-19 च्या अंदाजपत्रकात या वैद्यकीय महाविद्यालयासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यानंतर ही तरतूद यंदाच्या अंदाजपत्रकातही कायम आहे.

पुढील सात वर्षांत 10 टप्प्यांत काम

पालिकेच्या मार्च महिन्याच्या मुख्यसभेत माजी स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी या महाविद्यालयासाठी महापालिका आयुक्तच दिरंगाई करत असल्याची टीका केली होती. त्यानंतर प्रशासनाने तात्काळ सल्लागार नेमला आहे. त्यानुसार, पुढील सात वर्षांत 10 टप्प्यांत हे काम केले जाणार आहे.या सल्लागाराची पहिली बैठक नुकतीच महापालिकेत पार पडली. यात महाविद्यालयासाठी लागणार्‍या जागेवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार, नायडू हॉस्पीटलच्या परिसरात महापालिकेची सुमारे 42 एकर जागा असून त्यात वेगवेगळे प्रकल्प आहेत. तसेच, काही भागांत अतिक्रमणही आहेत. त्यामुळे सल्लागारांना नेमकी हवी असलेली माहिती महापालिकेकडून उपलब्ध व्हावी या उद्देशाने या जागेत ज्या विभागांचे कामकाज सुरू आहे. तसेच, ज्या विभागांकडे जागा आहे. त्यांच्याकडून माहिती तातडीने मिळावी यासाठी या सर्व विभागांना लेखी पत्र पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.