देवेंद्र फडणवीस : आरोग्याचा चातुर्मास शिबीराला भेट
बोपोडी । नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी लागणार्या सर्व सुविधा सरकारमार्फत पुरवल्या जाणार आहेत. या शिबीराच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रीया करण्याची गरज भासल्यास त्याचा खर्च सरकारतर्फे केला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
शिवाजीनगर मतदार संघात बारा ठिकाणी आमदार विजय काळे यांनी महिलांसाठी आयोजित केलेल्या आरोग्याचा चातुर्मास या आरोग्य तपासणी शिबीराला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. ग्रामीण रुग्णालय पुणे, खडकी कॅटोन्मेंट बोर्ड, दीनानाथ मंगेशकर रूग्णालय आणि पुणे मनपा आरोग्य विभागाच्या सहकार्याने बोपोडीच्या डॉ. राजेंद्र प्रसाद विद्यामंदीर शाळेमध्ये या शिबिराचे आयोजन केले होते. शिबीराचे उद्घाटन पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे, बोपोडी शिबीराचे आयोजक नगरसेवक प्रकाश ढोरे, विजय शेवाळे, सुनिता वाडेकर, आदित्य माळवे, खडकी कॅटोन्मेंटचे उपाध्यक्ष अभय सावंत आदी उपस्थित होते.
चांगली आरोग्य सेवा देण्यास शासन प्रयत्नशील
नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे आमची जबाबदारी आहे. महिलांसाठी सर्व प्रकारच्या तपासण्या या शिबिरात केल्या जाणार आहेत. आजपर्यंत 20 हजार नागरिकांच्या आरोग्य शस्त्रक्रीयेचा खर्च शासनाने केला आहे. नागरिकांना जास्ती-जास्त चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी शासनाचा प्रयत्न करत आहे. आरोग्य विषयक शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळावा यासाठी अशा शिबिरांचे जास्तीजास्त आयोजन करणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पिल्ले यांचा सत्कार
ध्यानचंद पुरस्कार विजेता खेळाडू रूपेस पिल्ले याचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच बोपोडीतील विविध समाजाच्या संघटनांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार काळे यांनी केले. सूत्रसंचालन अॅड. सुनिल जपे तर, कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वाचे आभार नगरसेवक ढोरे यांनी मानले.