‘वैद्यकीय शिक्षण व संशोधन’ राष्ट्रीय गोलमेज परिषद

0

पुणे । ‘वैद्यकीय शिक्षणाची सद्यस्थिती व भविष्यातील वाटचाल’ या अतिशय महत्त्वपूर्ण अशा विषयावरील दोन-दिवसीय राष्ट्रीय गोलमेज परिषद एमआयटी वर्ल्ड पीस युनिर्व्हसिटी येथे संपन्न झाली. जपरिषदेसाठी देशभरातून शासकीय व खासगी वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील अनेक कुलगुरू, अधिष्ठाता व इतर अनेक नामांकित शिक्षणतज्ज्ञ उपस्थित होते.याप्रसंगी संगणक तज्ज्ञ, पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाचे अध्यक्ष प्रा.डॉ.विश्‍वनाथ कराड हे होते.

यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. चंद्रकांत पांडव, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठचे माजी कुलगुरू डॉ. अरुण जामकर, डॉ.सुचित्रा नागरे, डॉ. गीतालक्ष्मी, डॉ.डी.पी.लोकवाणी, डॉ. विजय राघवन, डॉ. राजाराम पोवार, डॉ. एम.डी. वेंंकटेश, अश्‍विनी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सचिन मुंबरे, श्री सत्य साई वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. पी. एफ. कोटूर, डॉ. सिद्धार्थ दास आदी उपस्थित होते. डॉ. भटकर म्हणाले, सध्याच्या वैद्यकीय शिक्षण पद्धतीमध्ये आमुलाग्र सुधार होण्याची नितांत गरज आहे. भारताची प्रचंड लोकसंख्या लक्षात घेता, आपल्या देशामध्ये डॉक्टर व वैद्यकीय महाविद्यालयांची अपुरी संख्या तांतडीने वाढविण्याची गरज आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनानुसार जगात दरहजार लोकसंख्येमागे 1 डॉक्टर असणे आवश्यक आहे (1:1000), परंतु भारतात हे प्रमाण केवळ 0.6 इतके आहे, ही अतिशय खेदाची बाब आहे, त्यादृष्टीने देशभरात वैद्यकीय दर्जेदार शैक्षणिक सुविधा देणारी किमान 150-200 नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे.