जळगाव । महापालिकेतील कर्मचार्यांना आजारी पडल्यावर वैद्यकीय देयक मिळण्याची सुविधा आहे. परंतू गेल्या दिड दोन वर्षापासून वैद्यकीय सुविधा घेतलेल्या कर्मचार्यांचे बिलांची फाईल उपायुक्तांकडे अडकलेली आहे. याबाबत जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकरांनी दोन महिन्यापूर्वी दरमहिन्याला पाच कर्मचार्यांचे देयक काढावे, असे आदेश देवून सुद्धा हे बिल काढले जात नाही आहे.
वैद्यकीर बिलांबाबत कर्मचारी वंचित
महापालिकेतील वैद्यकीय देयकांची गेल्या दिड वर्षापासून फाईल ही पेंडीग पडलेली आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थीती हे कारण अधिकारी सांगून अद्याप हे देयक दिले नाही. 47 कर्मचार्यांच्या यादीच्या फाईलवर दोन महिन्यापूर्वी प्रभारी आयुक्तांनी पाच कर्मचार्यांचे दरमहिन्या बिल काढावे असे फाईलवर लिहून देखील उपायुक्त चंद्रकांत खोसे यांच्याकडे ती तशीच पेंडीग पडलेली आहे. शासनाकडून मनपाला मिळणारे जेएसीटीचे दरमहिन्याला येणार्या अनुदानातून हे पैसे द्यावे अशी मागणी वैद्यकीय बिल मिळण्यापासून वंचित असलेल्या कर्मचार्यांमधून होत आहे.
वैद्यकीय प्रतिपुर्वक देयक थकले
मनपाच्या 47 कर्मचार्यांचे वैद्यकीय प्रतिपुर्वक देयक 21 लाख रुपये 17 हजार 490 रुपये थकलेले आहे. उपायुक्त तसेच लेखापाल अधिकार्याने हे बिल कर्मचार्यांना देत नसल्याने रक्कमेत वाढ होत आहे. आयुक्तांचे आदेश असून देखील पाच कर्मचार्यांचे बिल दिले जात नसल्याने कर्मचार्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.