वैद्यकीय सेवेचे तीनतेरा!

0

महापालिका रुग्णालयांची अवस्था विदारक; महागड्या खासगी दवाखान्यांचा घ्यावा लागतो आधार
रावेत: महापालिकेतील सत्ता केंद्रांमध्ये उपनगरांना मोठा वाटा मिळत असतानाही सत्ताधार्‍यांनी या भागात आरोग्याच्या पायाभूत सुविधा पोचविण्याकडे दुर्लक्ष केले आहे. लाखो शहरी गरीब रुग्णांना वर्षानुवर्षे आरोग्यसेवेसाठी महागड्या खासगी डॉक्टरांच्या वैद्यकीय सेवेवर अवलंबून राहावे लागत आहे. राजकीय उदासीनता आणि लालफितीचा कारभार अशा कात्रीत गरीब रुग्ण सापडला आहे. मध्यवस्तीतील महापालिकेच्या रुग्णालयांपेक्षा उपनगरातील रुग्णालयांची अवस्था विदारक आहे. दुसर्‍या मजल्यावर रुग्ण विभाग, उपचारांच्या प्रतीक्षेत ताटकळत थांबलेले शहरी गरीब रुग्ण आणि तुटपुंजी औषधे, अशा अवस्थेत महापालिकेचा आरोग्य विभाग शहरातील नागरिकांना आरोग्यसेवा देत आहे.

वाल्हेकरवाडीत फक्त बाह्यरुग्ण विभाग
वाल्हेकरवाडी दवाखान्यात फक्त बाह्यरुग्ण विभाग आहे. सकाळी व सायंकाळी या वेळेत तेथे ही सेवा मिळते. तेथे मधुमेह आणि रक्तदाब आदी आजारांची औषधे मिळत नाही. येथे एक डॉक्टर, एक फार्मासिस्ट, चार परिचारिका पैकी एक दवाखान्यात इतर तीन बाह्य भागात आणि एक लिपिक, एक आरोग्य सेवक, एक वॉर्ड बॉय, एक आया मिळून जवळपास दहा जणांचा कर्मचारी वर्ग आहे. कर्मचारी संख्या कमी असल्याने नागरिकांची गैरसोय होते. येथे सुरक्षा कर्मचारी नाहीत. दवाखान्याच्या आवारात कचरा टाकण्यात येतो. त्याचा कर्मचार्‍यांना त्रास होतो. एकूणच वाल्हेकरवाडी परिसरात नागरिकांना दवाखान्याची गरज लागत नसल्याचे प्रशासनाला वाटते. वास्तविक उपचारांसाठी तालेरा अथवा ‘वायसीएम’मध्ये जाण्याशिवाय पर्याय नसतो; पण एवढ्या लांबून ‘वायसीएम’ला जाणे खर्चिक व वेळखाऊ ठरते. त्यामुळे नाइलाजास्तव नागरिकांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात.

एकही सुसज्ज दवाखाना नाही
1997 मध्ये महापालिकेत समाविष्ट झालेल्या वाल्हेकरवाडीची लोकसंख्या आता दुप्पट झाली आहे. परंतु या परिसरात एकही पालिकेचा सुसज्ज दवाखाना नाही. तसेच खासगी रुग्णालयांची संख्याही अल्प असल्याने नागरिकांना चिंचवड व इतर ठिकाणच्या रुग्णालयांचाच आधार घ्यावा लागतो. तालेराच्या धर्तीवर एक चांगले रुग्णालय असणे, ही या भागाची मागणी आहे. सध्या परिसरात अनेक साथीच्या रोगाने त्रस्त असणारे रुग्ण परिसरात पहवयास मिळतात. यामध्ये सर्दी, खोकला, थंडी-ताप अशा स्वरूपाच्याच रुग्णांची अधिक संख्या पहावयास मिळते. त्यामुळे रुग्णालयात नेहमी गर्दी असते. या रुग्णांना आवश्यक असणारा औषधांचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो, असे येथील प्रशासनाचे म्हणणे आहे. काहीवेळा रुग्णांच्या संख्येमध्ये अचानकपणे वाढ होत असल्यामुळे आवश्यक औषधांचा निर्माण होणारा तुटवडा लागलीच मुख्य कार्यालयाकडून पाठविला जातो. त्यामुळे रुग्णांना औषधांसाठी इतरत्र जावे लागत नाही, असे येथील कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे. शासकीय नियमानुसार आवश्यक असणारे बीसीजी गोवर, कावीळ पोलिओ यासारखे आवश्यक असणारे व इतर प्रकारचे सर्व लसीकरण रुग्णालयात उपलब्ध आहेत आणि गरजूंना ते नियमित दिले जातात. उपलब्ध असणारी कर्माच्या-यांची संख्या परिसरातील वाढती लोक संख्या पाहता खूपच कमी असल्यामुळे रुग्णांना सेवा देत असताना मर्यादा पडतात त्या मुळे रुग्णांना अनेक वेळ या ठिकाणी ताटकळत उभे राहावे लागल्याचे चित्र पहावयास मिळते.

खासगी दवाखान्याशिवाय पर्याय नाही
महापालिकेचा सक्षम दवाखाना नसल्याने गरीब रुग्णांना महागड्या खासगी आरोग्य सुविधांवर अवलंबून राहावे लागते. वाल्हेकरवाडी कराना खासगी रुग्णालयांचाच आधार राहिला आहे. महापालिकेच्या येथील दवाखान्यात अत्यंत अल्प सुविधा व अपुर्‍या मनुष्यबळामुळे या रुग्णालयांकडे नागरिक पाठ फिरवाताना दिसतात. दररोज रुग्णालयामध्ये रुग्णांना अपुर्‍या व्यवस्थेमुळे बराच वेळ थांबावे लागते. अनेकदा प्रसूती शस्त्रक्रियांसाठी वाय सी एम रुग्णालयात पाठवण्याचा सल्ला देण्यात येतो. वाढत्या परिसराचा विचार करून दवाखान्यांच्या यंत्रणेमध्ये आवश्यक असलेली वाढ करण्यात आलेली नाही. यामुळे या परिसरातील नागरिकांना खासगी रुग्णालयाचे महागडे उपचार घ्यावे लागतात. रुग्णांची दिवसेंदिवस वाढती संख्या लक्षात घेता या ठिकाणची असणारी व्यवस्था अपुरी पडत असल्यामुळे उपलब्ध असलेल्या कर्मचार्‍यांवर कामाचा ताण पडत आहे. रुग्णांना आवश्यक असणार्‍या काही षधांचा पुरवठा मात्र नियमित पणे मिळत आहे. परंतु इतर महागड्या औषधांसाठी रुग्णांची इतरत्र धावपळ करावी लागते.

गंभीर आजार असेल तर पळापळ
गंभीर स्वरूपाचा आजार असेल तर या ठिकाणी केवळ प्राथमिक उपचार करून इतर ठिकाणी पाठविले जाते. परिसराचा दिवसेंदिवस वाढतेनागरीकरण पाहता व रुग्णांची वाढती संख्या पाहता सध्याचे असणारे रुग्णालय परिसरासाठी अपुरे पडत आहे. रावेत, पुनावळे, वाल्हेकरवाडी चिंतामणी चौक, गुरुद्वारा चौक आदी परिसरातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी वाल्हेकरवाडी येथे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने दवाखाना चालविला जातो. दवाखाना कोठे आहे याची माहिती लगेचच नागरिकांना माहित पडत नाही. छोट्याश्या जागेत दुसर्‍या मजल्यावर दवाखाना आहे. रुग्णांना जिना चढून जाणे फार त्रासदायक असल्यामुळे या दवाखान्याकडे येण्यापेक्षा खासगी दवाखान्यात जाणे रुग्ण पसंद करतात. परिसरातील नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे अद्यावत रुग्णालयाची वारंवार मागणी करूनही प्रशासन या कडे डोळेझाख करीत आहे असे परिसरातील रुग्ण आणि नागरिकांचे म्हणणे आहे अनेकदा महामार्गावर होणार्‍या अपघातात उपचारांअभावी अनेकांना प्राण गमवावे लागले आहे. या पार्श्‍वभूमीवर तसेच वाढत्या लोकवस्तीचा विचार करून या परिसरात प्राधान्याने चांगल्या रुग्णालयाची आवश्यकता आहे.